कोल्हापूर : अंधश्रद्धा निर्मूलनाविषयी जनजागृती होण्यासाठी वडणगे येथील स्मशानभूमीमध्ये ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांनी अमावास्येची विज्ञानमय रात्र घालवली. यावेळी अंनिसच्या कार्यकर्त्यांनी केलेले प्रबोधन, विनोदी शैलीतील माहिती, कायदे आणि इतिहासाचे दाखले आणि खगोल अभ्यासकांनी घडविलेल्या अवकाश दर्शनातून या अनोख्या जनजागृती कार्यक्रमात रंगत आणली.सामाजिक न्याय विभागाने वडणगे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ‘स्मशानातील अमावास्येची विज्ञानमय रात्र’ या अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रमाचे नियोजन केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याची माहिती देण्यासाठी चक्क स्मशानभूमीत हा कार्यक्रम घेतला. सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी यासाठी पुढाकार घेतला.नागरिकांना, विद्यार्थ्यांना अंधश्रद्धा या विषयावर माहिती व्हावी, तसेच अंधश्रद्धा निर्मूलन, बुवाबाजी, जादूटोणा या विषयावर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष बाळासाहेब मुल्ला यांनी माहिती दिली. राजर्षी शाहू महाराजांनी अनेक अनिष्ट रूढी, परंपरांना मूठमाती दिली. समाजामध्ये त्याचे प्रबोधन व्हावे यासाठी मोफत शिक्षणास प्राधान्य दिले. राजर्षी शाहू महाराज त्यांच्या राजवाड्यावरून सोनतळी या ठिकाणी जाण्या-येण्यासाठी याच स्मशानभूमीच्या रस्त्याने जात असत, राजर्षी शाहू महाराज यांना या कार्यक्रमातून अभिवादन केल्याबद्दल महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा अध्यक्ष प्राचार्य विलास पवार यांनी आभार मानले.खगोल अभ्यासक किरण गवळी यांनी अवकाशातील ग्रह, तारे, राशी, नक्षत्र आदींची ओळख व खगोल शास्त्र, भूगोल शास्त्र, विज्ञानाबाबत सोप्या शब्दात पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून काळोख्या अंधारात अवकाश दर्शन घडवून विज्ञानवादी होण्यासाठी मार्गदर्शन केले. अंनिसच्या सीमा पाटील आणि यादव यांनी अंधश्रद्धा निर्मूलनाबाबत विनोदी शैलीतून मार्गदर्शन केले. सरपंच संगीता शहाजी पाटील यांनी प्रास्तविक केले. सचिन परब यांनी सूत्रसंचालन केले. वडणगेचे माजी उपसरपंच सयाजी घोरपडे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समाजकल्याण निरीक्षक कल्पना पाटील, नीलम गायकवाड, सुरेखा डवर, सविता शिर्के, सचिन कांबळे तसेच वडणगे ग्रामपंचायतीचे कर्मचारी, तरुण मंडळे यांनी परिश्रम घेतले.
Kolhapur News: अन् अमावास्येची रात्र विद्यार्थ्यांनी घालवली स्मशानात
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2023 2:13 PM