जयसिंगपूर : सक्तीच्या वीज बिल वसुली विरोधात आज, शुक्रवारी जयसिंगपूर महावितरण कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचे निवेदन आंदोलन अंकुशच्यावतीने महावितरण कार्यालयास देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, गेल्या तीन महिन्यांपासून राज्यामध्ये लॉकडाऊन आहे. त्यामुळे व्यवसाय व उद्योगधंदे बंद असल्यामुळे आर्थिक अडचण निर्माण झाली आहे. त्यातच महावितरणकडून थकीत वीजबिलप्रश्नी थेट वीज कनेक्शन तोडण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे महावितरणने घरगुती व शेतीपंपाची वीज कनेक्शन तोडू नयेत. तसेच शेतीपंपाची वीज बिले सरासरी युनिट लावल्याने अवाढव्य बिले आलेली आहे. ती दुरुस्त करून त्यामध्ये पन्नास टक्के सवलत द्यावी. शेतकरी स्वखर्चाने मीटर बसविण्यास तयार असतील तर मीटरची रक्कम बिलातून वजा करून मिळावी. तसेच सुरू असणारी सक्तीची वसुली थांबवून वीज कनेक्शन तोडू नयेत, या मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर राकेश जगदाळे, अमोल गावडे, भूषण गंगावणे, भानुदास माने, आप्पासो कदम, प्रवीण माने, योगेश जाधव, दिलीप माने यांच्यासह शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.