कोल्हापूर : निदान लवकर झालेल्या स्तनाच्या कर्करोगात रुग्णांना शस्त्रक्रियेपूर्वी गाठीच्या आसपास सर्व बाजूंनी स्थानिक भूल दिल्यास कर्करोगाची गाठ पुन्हा उद्भवण्याचा धोका कमी होण्याचा तसेच मृत्यूचाही धोका कमी झाल्याचे संशोधनामध्ये सिध्द झाले आहे.११ वर्षांच्या कालावधीत रुग्णांवर केलेल्या संशोधनाचे निष्कर्ष टाटा मेमोरियल सेंटर तर्फे पॅरिस येथे झालेल्या युरोपियन सोसायटी ऑफ मेडिकल ऑनकॉलॉजी (ESMO) वैद्यकीय परिषदमध्ये सेंटरचे संचालक डॉ. राजेंद्र बडवे यांनी सादर केले आहेत. विशेष म्हणजे कोल्हापूर कॅन्सर सेंटरचे डॉ. सूरज पवार यांचे या संशोधनामध्ये मोलाचे योगदान आहे.या नवीन पद्धतीमध्ये संपूर्ण भूल देण्याबरोबरच गाठीच्या आसपास सर्व बाजूने भूल देऊन गाठीतील पेशींचे विभाजन व हालचाल थांबवली जाते. भुलीचे इंजेक्शन दिल्यानंतर ५ मिनिटांनी शस्त्रक्रिया केली जाते. हा छोटासा प्रयोग प्रभावी ठरला आहे. जागतिक स्तरावर हा अशा प्रकारचा पहिलाच अभ्यास आहे. या प्रयोगामुळे कर्करोग पुन्हा होण्याचे प्रमाण ४ टक्क्यांनी कमी झाले आहे.तर मृत्यूचा धोका देखील कमी झाला आहे.स्तनाच्या कर्करोगामध्ये शस्त्रक्रिया हा प्रामुख्याने केला जाणारा उपचार आहे. शस्त्रक्रियेनंतर किमोथेरपी,हार्मोनथेरपी, रेडिओथेरपी अशा पुढील उपचार पद्धती पूर्ण केल्यानंतरही अनेकदा कर्करोगाची पुनरावृत्ती होण्याचा धोका असतो. याबाबत टाटा मेमोरियल सेंटर (मुंबई), कोल्हापूर कॅन्सर सेंटर (कोल्हापूर) यासह दिल्ली, गुवाहाटी, अहमदाबाद, हैदराबाद, कन्नूर, शिलॉंग, पुणे, मिरज येथील रूग्णालयांनी एक नवीन सोपी उपचार पद्धती अभ्यासातून सिद्ध केली आहे. कोल्हापूर कॅन्सर सेंटर गेली ११ वर्ष याबाबत संशोधन करत होते. येथील चेअरमन डॉ. सुरज पवार हेच प्रमुख संशोधक म्हणून क्लिनिकल रिसर्च विभागामध्ये कार्यरत आहेत.
..तर पुन्हा कर्करोगाची शक्यता कमी, डॉ. राजेंद्र बडवे यांचे संशोधन
By समीर देशपांडे | Published: September 20, 2022 7:15 PM