येथील सुकुमार कांबळे यांच्या घरी अंगणवाडी सुरू आहे. परंतु, त्याचे पाच वर्षांचे भाडे मिळालेले नाही तसेच सेविकेचाही २१ महिन्यांचा वाढीव फरक मिळालेला नाही. यासाठी वर्षभरापासून लेखी व तोंडी मागणी केली. परंतु, याकडे दुर्लक्ष केले. यासाठी ग्रामपंचायत सदस्य बाबूराव मेटकर व सिटूचे शिवाजी मगदूम हे पाठपुरावा करीत होते.
सभापती पूनम मगदूम यांनीही थकीत भाडे व अंगणवाडी सेविकेचा वाढीव मोबदला तत्काळ देण्याच्या सूचना दिल्या होत्या. तरीही प्रशासनाकडून टाळाटाळ होत होती. त्यामुळे नाइलाजास्तव १ मे रोजी पंचायत समिती कार्यालयासमोर निदर्शने करण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे संबंधित घरमालकाला धनादेश देण्यात आला, तर १५ मे पर्यंत सेविकेचे वाढीव मानधन देण्यात येणार आहे.
हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सभापती मगदूम, गटविकास अधिकारी संसारे, कागलचे पोलीस निरीक्षक नाळे, ग्रामसेवक कुंभार, प्रवीण पाटील, के. एन. कोरे यांचे सहकार्य मिळाले.