कोल्हापूर: केंद्र सरकार, राज्य सरकार यांच्याप्रमाणे ग्रामपंचायतीकडून देखील अंगणवाडी ताईंच्या पदरात आश्वासनाशिवाय दुसरे काहीच पडले नाही. गेले वर्षभर गावात कोरोनासेवा करूनही ठरवून दिलेले दरमहा एक हजाराचे मानधन देतानाही ग्रामपंचायती टाळाटाळ करत आहेत. काहीनी एक-दोन हफ्ते देऊन त्यांची बोळवण केली आहे, बाकीच्यांनी ती देखील तसदी घेतलेली नाही. त्यामुळे वर्षभर वाट पाहून संतापलेल्या अंगणवाडी ताईंनी आता आंदोलनास्त्र पुकारले असून, उद्या सोमवारी ग्रामपंचायतीसमोरच व्यथा मांडणार आहेत.
जिल्ह्यात गेल्या वर्षी कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून अंगणवाडी ताई काम करत आहेत. प्रबोधनापासून ते सर्वेक्षणापर्यंतची बरीचशी कामे या ताईंच्या अंगावर आहेत. त्यांना या बदल्यात ग्रामपंचायतीनी वित्त आयोगाच्या निधीतून दरमहा एक हजार रुपये द्यावेत, असे सरकारतर्फे सांगण्यात आले, तरीदेखील ग्रामपंचायत प्रशासन हालत नसल्याने ग्रामविकास विभागाकडून जसा जीआरच काढून मोबदला देणे बंधनकारक केले. एवढे करूनही यंत्रणा हालत नसल्याने अखेर जिल्हा परिषदेमार्फत ग्रामपंचायतींना नोटीसाही काढल्या. याचा परिणाम होऊन काही ग्रामपंयातींनी रक्कम देण्यास सुरुवात केली, पण त्यातही सातत्य नाही. कोरोनाच्या गेल्या वर्षातील मार्च ते सप्टेंबर आणि आता चालू वर्षी मार्चपासू्न आजअखेरपर्यंत सर्व रक्कम एकाही ग्रामपंचायतीकडून मिळालेली नाही.
शिक्षण मराठीतून, मग ट्रॅकर इंग्रजीतून का?
अंगणवाड्या बंद असल्याने बालकांना पोषण आहाराचे वाटप सुरूच आहे. त्याची माहिती रोजच्या रोज सॉफ्टवेअर भरली जात आहे, त्यासाठी महिला बालकल्याण विभागाने पोषण ट्रॅकर तयार केला आहे. पण तो इंग्रजीत असल्याने माहिती भरण्यात प्रचंड अडचणी येत आहे. अंगणवाडीचे शिक्षण मराठीतून होत असताना आणि अंगणवाडी कर्मचारी या उच्चशिक्षित नसतात, त्यामुळे भाषेचा अडसर येत असल्याने तो इंग्रजीऐवजी मराठीमध्ये उपलब्ध करून द्यावा अशी मागणी आहे.
प्रतिक्रिया
सातत्याने आवाज उठवून देखील दखल घेतली जात नसल्याने आता आंदोलनाची हाक दिली आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी म्हणून एकत्र न जमता त्या त्या गावातच आंदोलन करावे, असे सांगितले आहे.
सुवर्णा तळेकर, जिल्हा अंगणवाडी कर्मचारी महासंघ