कोल्हापूर अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढून ७०० हून अधिक मोबाईल जमा केले. घोषणाबाजी करत या कर्मचाऱ्यानी जिल्हा परिषदेसमोर ठिय्या मारल्याने या मार्गावरील वाहतूक वळवावी लागली. आप्पा पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने हा मोर्चा काढण्यात आला.
महावीर उद्यानापासून सुरू झालेल्या हा मोर्चा घोषणा देत जिल्हा परिषदेसमोर आला. या ठिकाणी आप्पा पाटील यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांची मांडणी केली. ते म्हणाले, दोन वर्षांपूर्वी दिलेले मोबाईल जुने झाले आहेत. त्याच्या दुरुस्तीला खर्च येत आहे. त्यामुळे ते आम्ही परत देत आहोत. आता नवीन मोबाईल द्यावेत. केंद्र शासनाचे पोषण ट्रॅकर ॲप बदलून ते मराठीत करावे, ॲपच्या माध्यमातून माहिती पाठवणे शक्य न झाल्यास मानधन कपात करू नये, मोबाईलवर काम करण्यासाठी देण्यात येणारा प्रोत्साहन भत्ता अनियमित आहे. तो वाढवून नियमित करावा. गणवेशाचे पैसे मिळावेत, रिक्त जागांवर भरती करावी. सेवानिवृत्तीचे लाभ मिळावेत, अशा विविध मागण्या असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आल्या.
यानंतर शाहुपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या समन्वयातून शिष्टमंडळ आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संंजयसिंह चव्हाण यांच्यात चर्चा झाली. या सर्व मागण्या शासनाकडे पाठवणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. यावेळी महिला आणि बालकल्याण विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिल्पा पाटील उपस्थित होत्या. यावेळी कर्मचाऱ्यांनी मोबाईल भरून आणलेले बॉक्स चव्हाण यांच्या टेबलवर ठेवले. नंतर ते शिल्पा पाटील यांच्या दालनात तर उर्वरित करवीर पंचायत समितीकडे पाठवण्यात आले.
जयश्री पाटील, सरिता कंदले, शोभा भंडारे, सुनंदा कुऱ्हाडे, मंगल गायकवाड, विद्या कांबळे, चंदा मांगलेकर, सविता माळी, शमा पठाण, अर्चना पाटील यांनी मोर्चाचे नेतृत्व केले.
२७०८२०२१ कोल झेडपी ०१
अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी दुपारी मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्याशी चर्चा केली आणि मोबाईल परत केले. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिल्पा पाटील, पोलीस निरीक्षक राजेश गवळी, कॉ. आप्पा पाटील उपस्थित होते.