गडहिंग्लज : कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी शासनाने हाती घेतलेल्या 'माझे कुटुंब माझी जबाबदारी 'या मोहिमेवर गडहिंग्लज तालुक्यातील अंगणवाडी कर्मचार्यांनी आज, सोमवारपासून (२१) बहिष्कार टाकला.तहसीलदार दिनेश पारगे व पंचायत समितीचे बालविकास प्रकल्प अधिकारी यांना शिष्टमंडळाने भेटून निवेदन देण्यात आले आहे. अतिरिक्त कामाच्या जबाबदारीतून अंगणवाडी कर्मचार्यांना वगळावे अशी मागणी करण्यात आली.निवेदनात म्हटले आहे, कोरोनामुळे गेल्या सहा महिन्यापासून अंगणवाडीची कुपोषणमुक्ती, पुर्व प्राथमिक शिक्षण व सर्वांगीण बालविकास आदी कामे ठप्प झाली आहेत. परंतु, आहार वाटप, लसीकरण, गृहभेटी, पोषण महिना, मुलांना व पालकांना मार्गदर्शन,बालकांची आरोग्य तपासणी आदी नियमित कामे करावी लागत आहे.त्यामुळे मोहिमेतील अतिरिक्त काम नको, अशी मागणी करण्यात आली.शिष्टमंडळात अंगणवाडी कर्मचारी सभेचे राज्य संघटक बाळेश नाईक, जिल्हाध्यक्षा अंजना शारबिद्रे, राजश्री बाबण्णावर, सुरेखा गायकवाड, भारती कुंभार, मालू केसरकर, सोना पाटील, सुवर्णा राऊत आदींचा समावेश होता.