कोल्हापूर : अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या न्याय्य मागण्यांसाठी सोमवारपासून (दि.११) राज्यव्यापी बेमुदत संप पुकारण्यात आला आहे. याचाच एक भाग म्हणून त्याच दिवशी सकाळी अकरा वाजता महावीर उद्यान येथून जिल्हा परिषदेवर महामोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघाचे अध्यक्ष अतुल दिघे व सचिव सुवर्ण तळेकर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले, पंकजा मुंडे या खात्याच्या मंत्री असून तीन वर्षात त्यांनी अंगणवाडी महिलांचे कोणतेही प्रश्न सोडवले नाहीत. आधीच्या सरकारने देवू केलेली मानधन वाढ त्यांनी एक वर्षासाठी नाकारली व ज्यांना वाढ दिली त्यांची वसुली लावण्याची भूमिका घेतली.
कर्मचाºयांच्या मानधनाची रक्कम त्यांनी मंत्रिमंडळाकडे मागितली नाही. शनिवारी त्या इचलकरंजीला येणार असल्याची माहिती मिळाली आहे. तसेच झाल्यास त्यांना संघटनेच्यावतीने काळे झेंडे दाखवण्यात येणार आहेत.
अंगणवाडी सेविकांना सध्या पाच हजार रुपये आणि मदतनीसांना अडीच हजार रुपये मानधन दिले जाते. केरळसह तेलंगणा, दिल्लीमध्ये ही रक्कम दहा हजार इतकी आहे. पाँडेचरीमध्ये किमान वेतन कायदा लागू आहे. कर्नाटकात आठ हजार रुपये मानधन आहे. असे असताना महाराष्ट्र शासनाच्या नाकर्तेपणामुळे व बेजबाबदारपणामुळे अंगणवाडी कर्मचाºयांना बेमुदत संप पुकारावा लागत आहे. यातून निर्माण होणाºया परिस्थितीला सरकारची भूमिकाच जबाबदार असणार आहे.
सोमवारी महामोर्चा काढल्यानंतर त्याचदिवशी रात्री सगळे कर्मचारी मंगळवारी (दि.१२) मुंबई येथे होणाºया मोर्चासाठी रवाना होणार आहेत. तरी अधिकाधिक अंगणवाडी कर्मचाºयांनी या मोर्चात व संपात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.