लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : शिक्षणाची पहिली पायरी असलेल्या अंगणवाड्यांचेही आता रूपडे पालटणार असून, स्मार्ट अंगणवाडी योजनेच्या माध्यमातून ‘प्ले-स्कूल’च्याही पुढे एक पाऊल टाकण्यासाठी त्या सज्ज झाल्या आहेत. शिकवण्यासाठी स्मार्ट टीव्ही, बसण्यासाठी बेंच, पिण्यासाठी शुद्ध पाणी, सोलरची वीज अशा सर्व सोईंनीयुक्त अंगणवाड्या या शैक्षणिक सत्रापासून सुरू होत आहेत. राज्याच्या महिला व बालविकास विभागाने प्रत्येक जिल्ह्यातील १०० याप्रमाणे राज्यातील ३ हजार ७२० अंगणवाड्यांची स्मार्ट म्हणून निवड केली आहे.
अंगणवाड्यांमधून शिक्षणाचा श्रीगणेशा होतो; पण अलीकडे खासगी शाळांचे आणि त्यातही इंग्रजी माध्यमांचे पेव फुटल्याने अंगणवाड्यांच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उभे ठाकले होते. आकार अभ्यासक्रमाच्या माध्यमातून अंगणवाड्यांमधील शिक्षणाचा दर्जा सुधारला जात आहे. तसेच पोषण आहाराचे लालूच दाखवून पटसंख्याही टिकवून ठेवण्याची कसरत केली जात आहे. आता खासगी शाळांपेक्षा सरस सुविधा व शिक्षण देण्यासाठी महिला व बालविकास विभागाने कंबर कसली आहे. उच्च दर्जाचे, अत्याधुनिक सोईंसह शिक्षण देण्यासाठी म्हणून स्मार्ट अंगणवाडी उपक्रमच या शैक्षणिक वर्षापासून हाती घेतला आहे.
अशी होणार निवड
प्रत्येक प्रकल्पातून प्रत्येकी ६ याप्रमाणे एका जिल्ह्यातील १०० अंगणवाड्या या पहिल्या टप्प्यात स्मार्ट म्हणून निवडल्या जात आहेत.
चौकट
काय असणार स्मार्ट साहित्य
स्मार्ट टीव्ही संच, ई-लर्निंग सिस्टिम, एज्युकेशन पेटिंग, साेलर लाईट सिस्टिम, स्वच्छ भारत किट, वीजविरहित पाणी शुद्धीकरण यंत्र, हॅन्ड वॉश बेसीन, बसण्यासाठी बेंच, इलेक्ट्रिक वजन काटे, अशा एकूण ११२ वस्तू स्मार्ट किट म्हणून अंगणवाड्यांना पुरवण्यात आल्या आहेत.
चौकट
भिंतीही होणार बोलक्या
स्मार्ट योजनेतून अंगणवाड्यातील शिक्षण अधिक आनंददायी करतानाच त्याच्या भिंतीही अधिक बोलक्या आणि आकर्षक व्हाव्यात म्हणून अंगणवाड्यांच्या इमारती आतून-बाहेरून रंगरंगोटी करण्यासह छत मजबुतीची कामे प्राधान्याने पूर्ण केले जाणार असल्याने खऱ्या अर्थाने हे ज्ञानमंदिर बोलके होणार आहे.
प्रतिक्रिया
अंगणवाड्यातील शिक्षण अधिक गतिमान आणि कालसुसंगत व्हावे यासाठीच हा उपक्रम हाती घेतला आहे. नेहमीप्रमाणे यालाही चांगला प्रतिसाद मिळेल आणि कोल्हापूर जिल्हा येथेही टॉपवर आणण्यासाठी प्रयत्न करू.
-सोमनाथ रसाळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महिला बालकल्याण
फोटो: ०९०६२०२१-कोल-अंगणवाडी
फोटो ओळ : स्मार्ट अंगणवाडी या योजनेंतर्गत प्रत्येक प्रकल्पासाठी ११२ साहित्यांचा समावेश असलेले स्मार्ट किट उपलब्ध झाले आहे.