समीर देशपांडे ।कोल्हापूर : गतवर्षी आलेल्या महापुरामध्ये हजारो नागरिकांचे प्राण वाचवणारा ‘व्हाईट आर्मी’चा जवान आदम मुल्लाणी (वय ३४) याच्या अपघाती निधनाने त्यांचाच संसार उघड्यावर पडला आहे. आपल्या जिवाची पर्वा न करता चिखली, आंबेवाडीपर्यंतच्या भर पुरात बोट घालणाऱ्या आदमची दोन्ही मुले वडिलांवाचून पोरकी झाली. आता या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी समाजाने घेण्याची गरज आहे.
मुल्लाणी कुुटुंबीय मूळचे सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील श्रीपत पिंपरी येथील. २०१२ साली आदम, त्याचा मोठा भाऊ तय्यब, आईवडिलांसह कोल्हापूरला आले. तय्यब हे इमारती रंगविण्याचे काम करतात. आदम पहिल्यापासूनच धाडसी. चरितार्थासाठी टेम्पो चालविणाºया आदमने या धाडसी स्वभावापायी अशोक रोकडे यांच्या ‘व्हाईट आर्मी’मध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला.
गेल्या वर्षीच्या महापुरामध्ये व्हाईट आर्मीचा पोशाख घालून हा पठ्ठ्या पहिल्या दिवसापासून कामाला लागला ते पूर ओसरल्यानंतरच त्याचे काम थांबले. चिखली, आंबेवाडी, सोनतळी कॅम्प, वडणगे या गावांतील अनेकांची महापुरातून सुटका करण्याची कामगिरी आदमने केली. ‘आदमदा, कुत्र्याला पण न्यायला पाहिजे,’ अशी हाक दिल्यानंतर बुडालेल्या घराच्या वरच्या छपरावरच्या कुत्र्यालाही मायेने बोटीत घेणारा असा हा आदम.
आम्हा पत्रकारांना एकीकडे या भीषण महापुराचे दर्शन आपल्या बोटीतून घडविताना प्रत्येक फेरीत औषध, गोळ्या, बिस्किटे पुरविण्यासाठी आपला जीव धोक्यात घालून तो बोट घराजवळ नेत होता.
पुरात अडकलेल्यांच्या लहान मुलांसाठी बिस्किटे नेणा-या या आदमचा दोन दिवसांपूर्वी बंगलोरला जात असताना अपघातात अंत झाला आणि त्याचीच दोन चिमणी पाखरं त्याला दुरावली. आदमची मोठी मुलगी चौथीमध्ये आहे, तर मुलगा तीन वर्षांचा आहे. पत्नी घरातच असते. केवळ आणि केवळ आदमच्या टेम्पो व्यवसायावर या सर्वांचा चरितार्थ चालत असे; त्यामुळे हे कुटुंबच उघड्यावर पडले आहे. आदमचे मोठे भाऊ त्यांची जबाबदारी घेणार आहेत; परंतु त्यांचेही हातावर पोट आहे.
त्यामुळे पंचगंगेच्या महापुरात आपल्या जिवाची पर्वा न करता हजारो जणांना वाचविण्यासाठी धावणाºया आदमच्या कुटुंबाची, त्याच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी आता समाजाने उचलण्याची गरज आहे. आपत्तीच्या काळात समाजाच्या मदतीसाठी धावणा-या कार्यकर्त्यांना बळ मिळण्यासाठी आता एक केले पाहिजे; आदमच्या खालील खाते क्रमांकावर दानशुरांनी आपली मदत पाठवून समाज अशा प्रसंगी कसा पाठीशी राहतो, हे दाखवून देण्याची ही वेळ आहे.
शकीला आदम मुल्लाणीकॅनरा बँक, साने गुरुजी वसाहत, शाखा कोल्हापूरखाते क्रमांक - ३८९४१0८000९८९आयएफसी कोड - सीएनआरबी 000३८९४
आमचा ‘व्हाईट आर्मी’चा एक खंदा जवान आम्ही गमावला. ज्या पद्धतीने त्याने महापुरामध्ये काम केले, ते खरोखरच अतुलनीय असे होते. त्याच्या अपघाती निधनामुळे त्याचे कुटुंब उघड्यावर पडले आहे. त्यांच्या कुटुंबीयांना ‘व्हाईट आर्मी’मार्फत शक्य ती मदत आम्ही करणारच आहोत. इतरांनीही ती करावी, असे आमचे आवाहन आहे.- अशोक रोकडे, संस्थापक, व्हाईट आर्मी