कोल्हापूूर : ‘गोकुळ’ दूध संघाने केलेल्याने पशुखाद्य दरवाढीमुळे दूध उत्पादकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. शिवसेनेने जनावरांसह संघाच्या ताराबाई पार्क कार्यालयावर मोर्चा काढून जाब विचारत संचालक मंडळच बरखास्त करण्याची मागणी केली; तर ‘शेकाप’ने लेखापरीक्षणातील ठपक्यांसह आकडेवारीच सादर करत दरवाढीचा अक्षरश: पोलखोलच केला.‘गोकुळ’ने पशुखाद्याच्या दरात प्रतिकिलो दोन रुपयांची वाढ केल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. लोकसभेचे मतदान झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ही वाढ केल्याने संचालकांवर सर्वच स्तरांतून टीकेचा भडिमार सुरू आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख व अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे उपाध्यक्ष संजय पवार व जिल्हाप्रमुख विजय देवणे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी दुभत्या जनावरांसह मोर्चा काढला.पितळी गणपतीपासून मोर्चा ताराबाई पार्कातील कार्यालयासमोर धडकल्यानंतर जोरदार घोषणाबाजी झाली. दरवाजालाच म्हशी बांधून सर्व शेतकरी चर्चेसाठी कार्यालयात गेले. कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर यांच्याशी झालेल्या चर्चेत त्यांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले.दरवाढीबाबत दिलेली कारणेच खोटी असल्याचे सांगत संजय पवार म्हणाले, डिझेलच्या दरात सहा महिन्यांत ७.४० रुपयांनी घट झाली असताना तुम्हीच जादा दराने डिझेल कोठून घेतले? वाहतुकीचा ठेक्याच्या संस्था कोणत्या संचालकांच्या आहेत? कच्च्या मालाच्या नावाखाली शेतकऱ्यांची लूट करणार असाल तर याद राखा!विजय देवणे म्हणाले, सरकारने अनुदान देऊनही गायीचे दूध २३ रुपयांनीच खरेदी करता, शेतकºयांंची उघड लूट करण्याचे धाडस आले कुठून? कच्च्या मालाच्या दराच्या तुलनेत पशुखाद्याचे दर दुप्पट वाढविले. एकूणच संचालक मंडळाचा व्यवहार हा शेतकरीविरोधी असून, संचालक मंडळ बरखास्तीची मागणी आम्ही सरकारकडे करणार आहे. पशुखाद्याची दरवाढ मागे घेतली नाही तर आगामी काळात आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी दिला. पशुखाद्याचे दरवाढी मागे घ्या, दुधाला किमान भाव २७ रुपये करा, जाणीवपूर्वक वासाचे दूध काढणे बंद करा, या मागण्यांचे निवेदन घाणेकर यांना दिले. यावेळी अध्यक्ष रवींद्र आपटे यांच्यासह संचालकांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या.प्रा. सुनील शिंत्रे, बाजीराव पाटील, कृष्णात पोवार, अवधूत साळोखे, शुभांगी पोवार, शिवाजी जाधव, मनजित माने, संभाजी भोकरे, दत्ताजी टिपुगडे, अविनाश शिंदे, संभाजी पाटील, आदी उपस्थित होते.सभा नव्हे, शिवसेनेचा मोर्चाविजय देवणे पशुखाद्याच्या दरवाढीवर पोटतिडकीने बोलत असताना डी. व्ही. घाणेकर दुसºया बाजूला वळून हसले. त्यामुळे देवणे संतप्त झाले, ‘ही ‘गोकुळ’ची सभा नव्हे; शिवसेनेचा मोर्चा आहे, ध्यानात ठेवा. गंमत करायला येथे आलोय काय?’ असे त्यांनी सुनावले.शिवसेनेचे तालुक्यांत रास्ता रोकोशिवसेनेच्या वतीने उद्या, गुरुवारी शिवाजी पूल, शुक्रवारी (दि. ३) बसस्थानक चौक आजरा, शनिवारी (दि. ४) शिरगाव-चंदगड फाटा, ७ मे रोजी गोकुळ शिरगाव, ८ मे रोजी बिद्री शीतकरण केंद्र येथे सकाळी ११ वाजता रास्ता रोको केला जाणार आहे.
‘गोकुळ’च्या पशुखाद्य दरवाढीवरून संताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 01, 2019 12:28 AM