कोल्हापूर : घरातील दोष, करणी, देवीचा कोप आदी दूर करण्याकरिता धार्मिक विधी करण्याच्या नावाखाली भोंदूगिरी करून एका निवृत्त सरकारी अधिकाऱ्यास सुमारे ६ लाख ६७ हजार रुपयांना गंडा घालण्याचा प्रकार घडला.
दिनकर हरी सूर्यवंशी (वय ६५, रा. देवकर पाणंद पेट्रोलपंपानजीक, जुना वाशीनाका) असे फसगत झालेल्या तक्रारदाराचे नाव आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार जुना राजवाडा पोलीस ठाण्यात दीपक पांडुरंग पाटील (४३, रा. मराठी शाळेनजीक, भोसलेवाडी, कोल्हापूर) या संशयितावर गुन्हा नोंद करण्यात आला.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संशयित दीपक पाटील याने फिर्यादी दिनकर सूर्यवंशी यांना, त्यांच्या घरातील सर्व दोष, करणी, तसेच देवीचा कोप दूर करण्यासाठी आपल्या ओळखीच्या देवबाबांकडून धार्मिक विधी व बळी देऊन करून देवकार्य करून घेऊ, असे सांगितले. या भोंदूगिरीच्या नावाखाली पाटील याने सूर्यवंशी यांच्याकडून जानेवारी ते जुलै २०१९ दरम्यानच्या कालावधीत वेळोवेळी सुमारे ६ लाख ६७ हजार रुपये उकळले.
हा सर्व व्यवहार सूर्यवंशी यांच्या घरात घडला. भोंदूगिरीच्या नावाखाली आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सूर्यवंशी यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदविली. त्याबाबत सोमवारी रात्री उशिरा दीपक पाटील याच्यावर पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.