दत्ता पाटीलम्हाकवे : मराठा समाजाच्या बांधवांचे निवेदन न स्वीकारताच सुसाट गेलेल्या पालकमंत्री हसन मुश्रीफांच्या भुमिकेबद्दल सोशल मीडियावर निषेध व्यक्त केला जात आहे. म्हाकवे ता. कागल येथील सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्री मुश्रीफ यांना निवेदन देण्याचा निर्णय घेतला होता. मुश्रीफांची गाडी म्हाकवेत काही सेकंद थांबलीही परंतु ते गाडीतून खालीच उतरले नाहीत. यामुळे मराठा समाजातून संताप व्यक्त होत आहे.बिद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान मंत्री मुश्रीफ हे म्हाकवे येथे येणार असल्याचे मराठा बांधवांना समजताच ते बस स्थानकावर निवेदन देण्यासाठी जमा झाले होते. बस स्थानकावर मंत्री मुश्रीफ यांचा गाडीचा ताफा येताच मराठा बांधव गाडीच्या दिशेने गेले. दोन ते तीन सेकंद गाडी थांबलीही परंतु मंत्री मुश्रीफ हे गाडीतून खाली उतरले नाहीत. शिवाय त्वरित गाडी मार्गस्थही केली. काही कार्यकर्ते गाडीचा पाठलाग करत काही अंतर गेले होते. परंतु मुश्रीफ हे न थांबताच पुढे गेल्याने कार्यकर्ते संतप्त झाले. याबाबत मुश्रीफ यांनी बैठकीमध्ये खुलासा करताना सांगितले की, मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी 24 डिसेंबरची डेडलाईन दिली आहे. तसेच, याबाबत निर्णय होईपर्यंत नेत्यांना गावबंदी करू नये अशा सूचनाही केल्या आहेत तरीही आपण ते निवेदन स्वीकारायला पुन्हा त्या युवकांकडे जाणार असल्याचे सांगितले होते. परंतु मराठा बांधव नाराज होऊन बस स्थानकांवरून निघून गेले होते. यावेळी मुश्रीफ यांनी येथील छत्रपती शिवाजी महाराज तसेच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून एक मराठा लाख मराठा अशा घोषणा दिल्या. यावेळी प्रदीप पाटील विकास पाटील पंढरीनाथ पाटील रामदास पाटील, अमित पाटील,केरबा पाटील यासह मराठा बांधव उपस्थित होते.मग मुश्रीफांनीच का थांबू नये ? गत तीन दिवसात म्हाकवे येथे खासदार संजय मंडलिक, भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे, माजी आमदार संजयबाबा घाटगे यांच्याही गाड्या थांबवून निवेदन दिले. यावेळी त्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आपले सहकार्य असल्याची घोषणा केली. माञ, मुश्रीफ यांनी आज आमची मने दुखावली असल्याच्या भावनाही कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या.
मुश्रीफांनी अपेक्षाभंग केलागावबंदी आहे हे सांगण्यासाठी आम्ही थांबलेलोच नव्हतो.तर केवळ निवेदन घेऊन ना.मुश्रीफ यांना या लढ्याला आपणही पाठबळ द्यावे अशी विनंती करण्यासाठी आम्ही थांबलो होतो. तसेच,ना.मुश्रीफ हे प्रत्येकाचे म्हणणे ऐकून घेणारे नेते असल्याने ते थांबतील असा विश्वास होता.माञ,आमचा त्यांनी अपेक्षाभंग केला. - प्रदीप, विकास पाटील- कार्यकर्ते सकल मराठा समाज