कोल्हापूर : कोरोना महामारीच्या संसर्गात खासगी रुग्णालयात डॉक्टर हात न लावताच दुरूनच औषधांचा सल्ला देऊन रुग्णापासून पिच्छा सोडवितात. अशा परिस्थितीतही कोल्हापुरातील सीपीआरच्या कोविड रुग्णालयात कोरोना पॉझिटिव्ह दोन रुग्णांवर अॅजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्याचा धाडसी प्रयोग यशस्वी केला; पण पुरुष रुग्णाला ऑक्सिजन कमी पडल्याने रविवारी त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली; तर दुसऱ्या महिला रुग्णाची प्रकृती सुस्थितीत आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णावर अॅजिओप्लास्टी शस्त्रक्रियेची पश्चिम महाराष्ट्रातील ही पहिलीच घटना.जिल्ह्यात कोरोना महामारीचा उद्रेक झाला आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण धास्तीने हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू पावत आहेत. सर्वत्र रुग्णांवरील शस्त्रक्रिया बंद आहेत. अशा स्थितीतही सीपीआर रुग्णालयातील कार्डिओलॉजिस्ट डॉ. अक्षय बाफना व त्यांच्या पथकाने शस्त्रक्रियेचे धाडस दाखविले.एक ४८ वर्षीय कोरोनाग्रस्त पुरुष रुग्ण सीपीआरमध्ये उपचार घेताना त्यांना शनिवारी (दि. २९) दुपारी अटॅक आला. डॉ. बाफना यांनी तातडीने त्याच्यावर तातडीने अॅजिओप्लास्टीही यशस्वी केली. रात्री त्याची प्रकृती सुस्थितीत होती, पण हा क्षणिक आनंद फार काळ टिकला नाही. रविवारी सकाळी शरीराने ऑक्सिजन कमी प्रमाणात घेतल्याने त्याचा दुर्दैवाने मृत्यू झाला.दरम्यान, आणखी एका ५३ वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह महिलेवरही शनिवारी रात्रीच सीपीआरमध्ये अॅजिओप्लास्टी शस्त्रक्रिया केली. रोगनिदानमध्ये आढळलेल्या तीन ब्लॉकेजपैकी एक तातडीने अॅजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करून काढून तेथे स्टेंट बसवली. आज, सोमवारी पुन्हा दोन्हीही ब्लॉकेज काढून स्टेंट बसविणार असल्याचे डॉ. बाफना यांनी सांगितले.
खासगी रुग्णालयात त्या कोरोना पॉझिटिव्ह आल्याने त्यांना सीपीआर रुग्णालयात दाखल केले. त्यानंतरच त्यांच्यावर तातडीची शस्त्रकिया करून त्यांना जीवदान मिळाले. त्या महिलेची प्रकृती सुस्थितीत असल्याचे डॉ. बाफना यांनी सांगितले.पीपीई किट घालून शस्त्रक्रियाकार्डिओलॉजिक्ट विभागप्रमुख डॉ. अक्षय बाफना यांना कार्डिओलॉजिस्ट डॉ. वरुण देवकाते, सिस्टर मेट्रन शामल पुजारी यांच्यासह सिस्टर पल्लवी जाधव, देवेंद्र शिंदे, उदय बिरंजे यांचे सहकार्य लाभले. या पथकाने अंगावर पीपीई किट परिधान करून या दोन्हीही शस्त्रक्रिया केल्या.