कोल्हापूर: शेतकऱ्यांना दिवसा दहा तास शेतीसाठी वीज मिळावी या मागणीसाठी येथील महावितरण कार्यालयासमोर गेली दोन दिवस स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचे धरणे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाकडे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने संतप्त अज्ञात शेतकऱ्यांनी कागल येथील महावितरणच्या कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय पेटवले.याची माहिती मिळताच छत्रपती शाहू साखर कारखान्याच्या अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, या घटनेनंतर आज दिवसभरात राज्यात या आंदोलनाचा भडका उडण्याची शक्यता आहे.शेतातील कामे सोडून काय भजन, किर्तन, मनोरंजन करायला येथे आलेलो नाही. शेतकऱ्यांचा रोष समजून घ्या, त्यांना किड्या मुंग्या समजू नका, त्यांचे प्रश्न गांभिर्याने घ्या नाही तर शेतकऱ्यांचा हिसका काय असतो ते येथेच दाखवून देऊ असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी महावितरणला दिला होता.
वीजेचे आंदोलन पेटले, संतप्त शेतकऱ्यांनी कागलमधील महावितरणचे कार्यालय पेटवलं
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2022 11:18 AM