सांगली : संपूर्ण राज्यभर गाजलेल्या सांगलीतील बहूचर्चित पोलिस कोठडीतील अनिकेत कोथळे खूनप्रकरणी सीआयडीने सोमवारी बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटेसह सात संशयिताविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. यामध्ये पाच बडतर्फ पोलिस व दोन खासगी संशयितांचा समावेश आहे. सातशे पानाचे हे दोषारोपपत्र आहे. यामध्ये संशयितांविरुद्ध खून, कट रचणे असे गंभीर आरोप ठेवण्यात आले आहेत. आतापर्यंत सव्वाशेजणांची चौकशी करुन जबाब नोंदविले असल्याचे दोषारोपपत्रात म्हटले आहे.सांगली शहर पोलिस ठाण्यातील तत्कालीन बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक युवराज बजरंग कामटे (वय ३६, रा. व्यंकटेश समृद्धी अपार्टमेंट, स्फूती चौक, विश्रामबाग), हवालदार अनिलकुमार श्रीधर लाड (५२, यशवंतनगर), अरुण विजय टोणे (४२, पोलिस वसाहत, विश्रामबाग), राहूल शिवाजी शिंगटे (३२, अकुजनगर, सांगली), नसरुद्दीन बाबालाल मुल्ला (३१, पंढरपूर रस्ता, पोलिस वसाहत, मिरज), झिरो पोलिस झाकीर नबीलाल पट्टेवाले (४४, पाकीजा मस्जीजजवळ, शंभरफुटी रस्ता) व बाळासाहेब आप्पासाहेब कांबळे (४८, सत्यविनायक अपार्टमेंट, खणभाग, सांगली) अशी दोषारोपपत्र दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. कामटे हा मुख्य संशयित आहे. बाबासाहेब कांबळे हा त्याचा मामेसासरा आहे. सध्या सर्वजण कोल्हापुरातील कळंबा कारागृहात आहेत.पोलिस उपअधीक्षक मुकूंद कुलकर्णी, पोलिस निरीक्षक गीता बागवडे यांच्या पथकाने सोमवारी दुपारी साडेबारा वाजता मुख्य न्यायदंडाधिकारी भाविशा गारे यांच्या न्यायालयात संशयिताविरुद्ध सातशे पानांचे दोषारोपपत्र दाखल केले. तपास अजूनही सुरु असल्याने संशयितांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुरवणी दोषारोपपत्र दाखल करण्यास परवानगी देण्याची मागणी सीआयडीने न्यायालयास केली आहे.
न्यायालयाने तशी परवानगीही दिली आहे. विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांना दोषारोपपत्र दाखल केल्याची माहिती देण्यात आली आहे. आता हे दोषारोपपत्र जिल्हा न्यायालयात वर्ग होणार आहे. त्यानंतर कामटेसह सर्व संशयितांना न्यायालयात उभे करुन त्यांच्यावर ठेवण्यात आलेल्या आरोपांची माहिती दिली जाणार आहे. यावेळी अॅड. उज्वल निकम सुनावणीला उपस्थित राहणार आहेत.
सांगली शहर पोलिसांनी ६ नोव्हेंबर २०१७ रोजी अनिकेत कोथळे व अमोल भंडारे या दोघांना अटक केली होती. न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी दिली होती. कोठडीच्या पहिल्याचदिवशी गुन्हा कबूल करण्यासाठी अनिकेतला नग्न करुन उलटा टांगून बेदम मारहाण केली होती. यामध्ये अनिकेतचा मृत्यू झाला होता.
हे प्रकरण अंगलट येऊ नये, यासाठी ७ नोव्हेंबरला अनिकेतचा मृतदेह आंबोली (जि. सिंधुदुर्ग) येथे जाळला होता. याप्रकरणी ८ नोव्हेंबरला बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक व मुख्य संशयित युवराज कामटे, हवालदार अनिल लाड, अरुण टोणे, राहुल शिंगटे, नसरुद्दीन मुल्ला, झिरो पोलिस झाकीर पट्टेवाले, कामटेचा मामेसासरा बाळासाहेब कांबळे या सातजणांना अटक केली होती.