कोल्हापूर : कणेरी मठावर होणाऱ्या पंचमहाभूते महोत्सवाच्या निमित्ताने देशी प्रजातींच्या गाय, म्हशी, बकरी, अश्व, कुत्रे व मांजर यांचे अनोखे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. त्यामुळे देशी जनावरांचे संगोपन व संवर्धनाची व्याप्ती वाढण्यास मदत होणार आहे. प्रदर्शनाबरोबर प्रत्येक जनावरांच्या विविध गटात भव्य स्पर्धा होणार असून, त्यासाठी ६९ लाखांची बक्षिसे देण्यात येणार आहेत. जनावरांची सौंदर्य स्पर्धाही यावेळी घेण्यात येणार आहे.पर्यावरण रक्षणाबरोबरच देशी प्रजातींच्या जनावरांचे संगोपन आणि संवर्धन करण्याच्या हेतूने सिद्धगिरी कृषी विज्ञान केंद्र व राज्य सरकारच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने २१ ते २३ फेब्रुवारीदरम्यान हे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. देशभरातून त्याला अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे. शेतकऱ्यांनी यासाठी मोठ्या प्रमाणात नावनोंदणी केली आहे.
मठावर गोशाळा असून, येथे हजारावर गायी आहेत. नुकतेच येथे भटक्या कुत्र्यांची शाळा सुरू करण्यात आली आहे. सुमंगलम् पंचभूत महोत्सवासाठी मोठ्या प्रमाणात शेतकरी येणार आहेत. त्यामुळे देशी प्रजातींच्या जनावरांचे भव्य प्रदर्शन हे महोत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे.तीन दिवस होणाऱ्या या प्रदर्शनासाठी भव्य मंडप उभारण्यात आला आहे. सर्वोत्कृष्ट गाय आणि बैलाला एक लाखाचे तर म्हैस व रेड्याला ५१ हजारांचे बक्षीस दिले जाणार आहे. मांजर, श्वान, शेळी, बोकड यांच्याही स्पर्धा घेतल्या जाणार आहेत. देशभरातील विविध जातींचे अश्व येथे पाहायला मिळणार आहेत. देशी अश्व स्पर्धेत प्रथम क्रमांकास लाखाचे बक्षीस देण्यात येणार आहे. प्रत्येक जनावरामध्ये नर व मादी अशा दोन गटात बक्षिसे दिली जाणार आहेत.गाढवांचे प्रदर्शनअलीकडे अतिशय दुर्मीळ होत असलेल्या गाढवांचेही येथे भव्य प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. देशातील हे पहिलेच प्रदर्शन आहे. गाढवांच्याही स्पर्धा घेण्यात येणार आहेत. गाढवाची देशी प्रजाती दुर्मीळ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर हे प्रदर्शन अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. तसेच हे प्रदर्शन नागरिकांच्या औत्सुक्याचा विषय ठरणार आहे.