कोल्हापूर : मूळची कोल्हापूर जिल्'ातील बेकनाळ (ता. गडहिंग्लज) येथील व सध्या भारतीय फुटबॉल महासंघात ग्रासरूट व्यवस्थापक असलेली अंजू तुरुंबेकर हिची आशियाई फुटबॉल कॉन्फेडरेशनच्या ग्रासरूटस् डेव्हलपमेंट समिती सदस्यपदी निवड झाली. तिची याबद्दलची शिफारस भारतीय फुटबॉल महासंघाने केली होती. अशाप्रकारे फुटबॉल क्षेत्रात निवड होणारी ती पहिली भारतीय महिला ठरली आहे.
अंजू ही मूळची बेकनाळ (गडहिंग्लज) येथील शेतकरी कुटुंबातील.तिने दहावीत असतानाच गडहिंग्लजच्या मास्टर्स स्पोर्टस् क्लबकडून फुटबॉलचे प्राथमिक ज्ञान घेतले आहे. यादरम्यान तिची १९ वर्र्षांखालील महाराष्ट्र संघातून निवड झाली. मुंबई येथे प्रशिक्षणादरम्यान तिला संतोष कश्यप भेटले. त्यांनी तिला बहुमोल मार्गदर्शनही केले. त्यानंतर तिने महाराष्ट्राचे कर्णधारपदही पटकाविले. बारावी झाल्यानंतर पोलीस भरती हो म्हणून वडील आग्रह करू लागले. त्यामुळे तिने घरात न सांगताच पुणे गाठले. तेथे एका क्लबकडून खेळल्यानंतर तिला मुंबईत मॅजिक बस फौंडेशनकडे प्रशिक्षक म्हणून संधी मिळाली. दरम्यान, राष्ट्रीय महिला संघात जाण्यासाठी तिचे कसोशीने प्रयत्न सुरूच होते. त्यात तिला प्रशिक्षक म्हणून तिला विशेष गोडी निर्माण झाली. मॅजिक बसकडे सुमारे पाच ते सहा वर्षे काम केल्यानंतर तिला हॉलंड येथे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षणासाठी जाण्याची संधी मिळाली. पुढे जानेवारी २०१८ मध्ये तिने भूतान येथे ‘एएफसी’तर्फेघेण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय ‘ए’ लायसेन्स प्रशिक्षक परीक्षेतही यश मिळविले. केवळ यश न मिळवता ती लायसेन्स मिळविणारी महाराष्ट्रातील पहिली महिला व देशातील सर्वांत तरुण फुटबॉल प्रशिक्षक ठरली होती तर आता ग्रासरूटमधील कामगिरीची दखल घेत अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने तिची आशियाई फुटबॉल कॉन्फेडरेशन या आशियाई देशातील फुटबॉलमधील शिखरसंस्थेच्या ग्रासरूट डेव्हलपमेंट समितीच्या सदस्यपदी शिफारस केली होती. त्यानुसार तिची निवड झाली आहे. आशियाई फुटबॉल कॉन्फेडरेशनवर निवड होणारी ती पहिली भारतीय महिला ठरली आहे.अखिल भारतीय फुटबॉल महासंघाकडे ग्रासरूट डेव्हलपमेंट प्रमुख म्हणून ती दिल्ली येथील मुख्यालयात गेली पाच वर्षे कार्यरत आहे. देशातील ६ ते १२ वयोगटांतील मुला-मुलींना प्रशिक्षण देणाऱ्या प्रशिक्षकांना ती प्रशिक्षण देत आहे. सन २०१७ मध्ये ‘एआयएफएफ’च्या ‘मिशन इलेव्हन मिलीयन’ कार्यक्रमाची प्रमुख म्हणूनही तिने काम केले होते.
अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने माझ्या ग्रासरूटमधील कामाची दखल घेऊन ही निवड केली आहे. आता मला संपूर्ण आशियाई देशामध्ये ६ ते १२ वयोगटांतील मुला-मुलींमध्ये फुटबॉलचे प्राथमिक धडे द्यायचे आहेत. त्याकरीता चांगले प्रशिक्षक निर्माण करायचे आहेत. निवड होणारी पहिली भारतीय महिला ठरली. त्याचा मला अभिमान आहे.- अंजू तुरुंबेकर, ग्रासरूट प्रमुख, अखिल भारतीय फुटबॉल महासंघ.