कोल्हापूर : थकीत मानधन देण्याचे आश्वासन शासनाने दिल्याने गेले पंधरा दिवस जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात सुरू असलेले अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे आंदोलन अखेर मागे घेण्यात आले. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना राज्य शासनाचे आॅक्टोबरपासून, तर केंद्र सरकारचे तीन महिन्यांचे मानधन मिळालेले नाही. काँग्रेस आघाडी सरकारने एप्रिल २०१४ पासून सेविकांना ९५०, तर मदतनिसांना ५०० रुपये मानधन वाढीची घोषणा केली होती, पण त्याची अंमलबजावणी सर्व प्रकल्पांमध्ये झाली नव्हती. काही प्रकल्पात वाढीव मानधन दिल्याने बहुतांशी प्रकल्पांना मानधनच मिळाले नाही. वाढीव मानधन सोडा पण जुने मानधनही मिळालेले नाही. राज्याचे आॅक्टोबरपासून, तर केंद्राचे मार्चपासून मानधन मिळाले नसल्याने अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यात शाळा सुरू झाल्याने मुलांचा शैक्षणिक खर्च कसा करायचा, असा पेच कर्मचाऱ्यांसमोर आहे. या विरोधात ८ जूनपासून कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी धरणे आंदोलन सुरू केले होते. याबाबत राज्याच्या ग्रामीण विकासमंत्री पंकजा मुंडे यांच्याशी अंगणवाडी कर्मचारी कृती समितीची बैठक झाली. त्यामध्ये त्यांनी तत्काळ प्रलंबित मानधन देण्याचे आदेश दिले. त्यामुळे कर्मचारी संघाने मंगळवारी धरणे आंदोलन मागे घेतले. वाढीव मानधनासाठी १ जुलैपासून ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा दिला होता, पण मंत्री मुंडे यांनी याबाबत आश्वासन दिल्याने ‘काम बंद’ आंदोलनही स्थगित केल्याची माहिती सुवर्णा तळेकर यांनी दिली. (प्रतिनिधी) तूर्त नियमित मानधन होणार अदाकाँग्रेस आघाडी सरकार व त्यानंतर युती सरकारने वाढीव मानधनाची घोषणा केली, पण अंमलबजावणी अद्याप झालेली नाही, जुन्या-नव्या गोंधळामुळे नियमित मानधनही अडकल्याने कर्मचारी हवालदिल झाले होते. त्यामुळे नियमित मानधन देऊन वाढीव मानधनाचा आढावा घेण्याचे आदेश शासनाने दिले आहेत.
अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मिळणार थकीत मानधन
By admin | Published: June 24, 2015 12:33 AM