कोल्हापूर : येथील राठोड परिवारातील कुमारी अंकिता सुनील राठोड ही आयएएस होण्याची तयारी करत होती. मात्र अचानकच तिच्यात दीक्षा संन्यास घेण्याचे भाव जागृत झाले. कोविड काळात सर्व जग थांबले असताना जैन धार्मिक पुस्तकांचे वाचन करत धर्माविषयी ओढ वाढत गेली. अंकिताच्या मनात धर्म आणि दीक्षाविषयी अनेक प्रश्न निर्माण होत गेलेत आणि योगायोगाने तिच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर जैन साधू साध्वी यांच्याकडून तिला मिळत गेली.अंकिताचा आज शनिवारी दीक्षा ग्रहण कार्यक्रम शिरोली येथे होत आहे. आचार्य अजित शेखरसुरीश्वरजी महाराज आणि गुरुमाउली कोल्हापूर दीपिका, साध्वीजी दर्शनप्रभाश्रीजी यांच्या निश्रेत होत आहे. त्यानिमित्त तिची रथयात्रा समाजबांधवांच्या वतीने काढण्यात आली. समस्त जैन संघाच्या वतीने आणि राठोड परिवाराच्या वतीने तिचा बिदाई सत्कार समारंभ करण्यात आला.जिल्हाधिकारी होण्याचे स्वप्न मनात राहिले असले तरी अंकिताला साध्वी होण्याचे स्वप्न पूर्ण होत आहे. अंकिताच्या मित्र परिवारच्या वतीने तिला बिदाई कार्यक्रम वेळी जिल्हाधिकाऱ्यांचा वेष धारण करून लाल दिव्याच्या गाडीतून कार्यक्रमस्थळी आणण्यात आले तेव्हा अंकिताचे आजोबा सुरेश, आजी सुशीला, आई, वडील, काका, काकी, भाऊ, बहीण सर्वांच्या डाेळ्यात आनंदाश्रू तरळले.जैन समाजच्या वतीने अंकिताच्या नवीन संयमी जीवनासाठी आशीर्वाद देऊन सॅल्युट करण्यात आला. यावेळी सर्व परिसर भारत माता की जय, वंदे मातरमच्या जयघोषाने मंत्रमुग्ध झाला. या कार्यक्रमात शाहू छत्रपती, मालोजीराजे छत्रपती, तसेच जैन मंदिरचे ट्रस्टी, तसेच पुणे, राजस्थान फुंगणी, कराड, सातारा, वडगाव, ईश्वरपूर, चेन्नई, बंगलोर व भारतातून विविध गावातून आलेले जैन बांधव उपस्थित होते.
अधिकारी होण्याचा मोह सोडला, साध्वी बनण्याचा निर्णय घेतला; कोल्हापूरची अंकिता आज घेणार दीक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2024 3:25 PM