शिरोळ : शासनाच्या आदेशानुसार सर्व खासगी रुग्णालयाची बिले दैनंदिन तपासून अहवाल देण्यात यावा. याबाबत सर्व लेखा परीक्षक यांना तालुका प्रशासनाने आदेश दिल्यानंतर आंदोलन अंकुश या सामाजिक संस्थेने तीन दिवसांपासून सुरू केलेले आत्मक्लेष आंदोलन बुधवारी मागे घेतले.
जयसिंगपूर आणि परिसरातील रुग्णालयांकडून जादा बिलांची आकारणी केली जात असल्याच्या निषेधार्थ आंदोलन अंकुशकडून आंदोलन सुरू होते. लेखा परीक्षकांनी दररोज प्रत्येक रुग्णालयाची बिले तपासून तहसीलदार यांना अहवाल द्यावा, अशी आग्रही मागणी करण्यात आली होती.
दरम्यान, तहसील कार्यालयात तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे यांच्या अध्यक्षतेखाली आंदोलनकर्ते व प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. बैठकीत सिद्धिविनायक मंदिरा शेजारील कोविड केंद्रातील व्हेंटिलेटर खासगी रुग्णालयालात का देण्यात आली. अन्य इतर साहित्याबाबत माहिती द्यावी, अशी मागणी धनाजी चुडमुंगे यांनी यावेळी केली.
व्हेंटिलेटरवर उपचार झालेल्या रुग्णांचे खासगी रुग्णालयाने पैसे परत करावेत. उदगांव व आगर कोविड केंद्रातील गंभीर रुग्णांना उपचारासाठी हे व्हेंटिलेटर खासगी रुग्णालयाने रिकामे ठेवावेत, अशी मागणी प्रशासनाकडे केली असल्याचे चुडमुंगे यांनी सांगितले. यावेळी गटविकास अधिकारी शंकर कवितके, डॉ. पी. एस. दातार यांच्यासह लेखापरीक्षक उपस्थित होते.