कोल्हापूर : साखर कारखान्यांनी या हंगामातील उसाचा दुसरा हप्ता प्रति टन ५०० रुपये द्यावा, या मागणीसाठी शिरोळच्या आंदोलन अंकुश संस्थेतर्फे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक ठिय्या आंदोलन करण्यात आले.सकाळी अकराच्या सुमारास जोरदार घोषणाबाजी करीत ठिय्या आंदोलन सुरू केले. शिष्टमंडळाने जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले.निवेदनात म्हटले आहे, मागील उन्हाळ्यात पाण्याच्या कमतरतेमुळे शेतकऱ्यांनी अतिशय कष्टाने व पाण्यासाठी जादा खर्च करून उसाचे पीक जगविले होते. पण सरासरीपेक्षा यावर्षी उत्पादन कमी मिळालेले आहे. याउलट उसाच्या कमतरतेमुळे साखरेचे उत्पादन कमी झाल्याने साखरेला सर्वांत जास्त दर यावर्षी कारखान्यांना मिळाला आहे. भविष्यात साखरेचे दर आताच्या दरापेक्षा वाढणार असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. साखरेला जादा मिळत असलेला व उपपदार्थांच्या चांगल्या दरातूनही मोठ्या प्रमाणात कारखान्यांना यंदा फार मोठा फायदा उसाच्या उत्पन्नातून मिळाला आहे. त्यामुळे साखर कारखान्यांना झालेला फायदा थेट शेतकऱ्यांना द्यावा. कारण हे कारखाने शेतकऱ्यांच्याच मालकीचे आहेत, असे या निवेदनात म्हटले आहे.आंदोलनात धनाजी चुडमुंगे, संतोष खोत, राजेंद्र पाटील, बापूसो काळे, प्रवीण माने, सुखदेव खडके, मारुती नंदीवाले, दत्ता मोरे, राकेश जगदाळे, सुनील सावंत, अमर शिंदे, सूरज पाटील, अशोक देशमुख, सागर कांबळे, नितीन खांडेकर, संजय कुलकर्णी, मधुकर सासने, कृष्णात गोते, आदी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी आंदोलन अंकुश संस्थेने उसाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी लाक्षणिक ठिय्या आंदोलन केले.
उसाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी ‘अंकुश’चे ठिय्या आंदोलन
By admin | Published: April 11, 2017 12:30 AM