अनंत माने ऊर्फ अण्णा - एक यशस्वी दिग्दर्शक. त्यांच्याबद्दल अनेक वत्सल आठवणी आहेत. अण्णांची पत्नी आणि माझी माँ खास मैत्रिणी होत्या. माझे वडील म्हणजे नटश्रेष्ठ जयशंकर दानवे भालजी पेंढारकरांचे सहायक दिग्दर्शक आणि अण्णा व्ही. शांताराम यांचे सहायक दिग्दर्शक. दोघेही एकाच क्षेत्रातले. १९६९ मध्ये ‘डोंगरची मैना’ चित्रपटातील खलनायकाच्या भूमिकेसाठी विचारायला अण्णा स्वत: घरी आले. तसेच दि. २४ मार्च १९७३ रोजी अण्णा माझ्यासाठी घरी आले. ‘‘आम्ही गोकुळच्या गौळणी’’ नाटकासाठी त्यांना पार्श्वगायिकेची गरज होती. त्याकाळी मी आॅर्केस्ट्रा, भक्तिगीत, भावगीत कार्यक्रम करीत होते. मी संगीत विशारदही झाले नव्हते. पण, जगदीश खेबुडकरांच्या ‘रामदर्शन’ या कार्यक्रमात गात होते. एवढे मोठे दिग्दर्शक मला बोलवायला आले हे पाहून मी गांगरूनच गेले. पप्पांनाही खूप आश्चर्य वाटले. पप्पा म्हणाले, अहो ती अजून एवढी मोठी गायिका झाली नाही, की तुमच्यासारख्यांनी तिला घरी बोलवायला यावं. अण्णा हसून म्हणाले, मला खेबुडकरांनी तिच्याबद्दल सांगितले आहे, त्यामुळे तिच्याबद्दल विश्वास वाटतोय. अशा तऱ्हेने पार्श्वगायिका म्हणून माझी त्या नाटकासाठी निवड झाली. त्याकाळी अण्णांच्या प्रत्येक महिन्याच्या १ ते १० तारखा नाटकांसाठी बुकिंग केलेल्या असत. माँ म्हणाली की, तिला नाटकांच्या दौऱ्यासाठी एकटीला पाठविणार नाही. त्या सुमारास नाटकांत उषा नाईक, माया जाधव, जयमाला इनामदार, शोभा सासने, शोभा चिरवले अशा पाच स्त्री कलाकार होत्या. ज्या पुढे नावारूपाला आल्या. अण्णा म्हणाले, मी जर सर्व स्त्री कलाकारांचे पालक घेऊन दौऱ्यावर जाऊ लागलो, तर एक वेगळी बसच करावी लागेल. जी परवडणारी नाही; पण मी एकटी जायला तयार होत नव्हते. आश्चर्य म्हणजे दहा दिवसांच्या पहिल्या दौऱ्यात अण्णांनी माझ्यासोबत माँला येण्याची परवानगी दिली. नाटकातील दहा गाणी म्हणजे लावण्याच. त्या मी ठसकेबाजपणे सादर केल्या. अण्णा माझ्या आवाजावर, गाण्यावर खूश असत. पार्श्वगायिका म्हणून माझा पहिला प्रयोग भरत नाट्य मंदिर, पुणे येथे झाला. नंतर जालना, औरंगाबाद, दौंड, नाशिक, ओझर, कोरेगाव, पंढरपूर, सातारा, सांगली, मिरज, इचलकरंजी आणि मुंबई येथे मिळून ७५ प्रयोग मी गायिका म्हणून केले. नंतर अण्णांनी याचे ‘पांच रंगाची पांच पाखरं’ या चित्रपटात रूपांतर केले. २२ मे १९७४ ला कृष्णा कल्ले या ज्येष्ठ गायिकेबरोबर गाण्याची संधी मिळाली. त्यानंतर त्यांच्या ‘पाहुणी’ चित्रपटासाठी मुंबईला शशांक स्टुडिओत उषा मंगेशकरसोबत गाण्याची संधी मिळाली. या सर्व कला प्रवासात माझ्या पप्पांना दिलेला शब्द पाळून वत्सल पित्याप्रमाणे अण्णांनी मला सांभाळले. - जयश्री जयशंकर दानवे.चित्रपट कथांसाठी वाचनाचा निदिध्यासचित्रपटांच्या कथांसाठी, नेहमी त्यांच्या शोधात राहणे हे अण्णांचे एक वेडच होते. अण्णा पहाटे चारला उठतात, असे मला कुणीतरी सांगितले. उत्सुकतेपोटी मला प्रश्न पडला, ‘चार वाजता उठून, पहाटेपासून अण्णा करतात काय?’ नंतर त्याचाही शोध मला लागला. अण्णा केवळ वाचक नव्हते, तर साहित्याचे जागरूक भक्त होते, उपासक होते. सकाळी सहाच्या दरम्यान, अंबाबाई मंदिरातही मला ते भेटत. अंबाबाईचे दर्शन ते सहसा चुकवत नाहीत आणि दर्शनानंतर त्यांच्या माडीवरच्या अभ्यासिकेत अखंड वाचन. एकदा सकाळी सकाळी शूटिंगची चौकशी करण्यासाठी मला विलासरावांना (अण्णांचे ज्येष्ठ चिरंजीव) भेटायचे होते; पण दारातच अण्णा उभे होते आणि त्यांच्या हातात पुस्तक होतं. मी सहज विचारलं, ‘अण्णा, काय वाचताय?’ अण्णा म्हणाले, ‘एक फार चांगलं पुस्तक वाचतोय. मूळ इंग्रजी पुस्तक आहे ‘ए लेटर टू अ टीचर.’ त्याचा हा मराठी अनुवाद आहे, ‘प्रिय बाई.’ भालचंद्र, तुम्ही शिक्षकांनी, तर हे पुस्तक अवश्य वाचलं पाहिजे. तथाकथित मागासवर्गीय, खेड्यातल्या मुलांना, आपल्या अपयशाला समजून न घेणारी, तुमची शालेय व्यवस्था कारणीभूत आहे,’ अशी तक्रार मुख्याध्यापिका बार्इंकडे केली आहे. अहो, खुद्द पु. ल. देशपांडेंनी म्हटलंय, हे पुस्तक वाचून माझी झोप उडाली. या पुस्तकानं मलाही वेड लावलंय. लवकर संपेल म्हणून हळूहळू वाचतोय. अण्णांकडे ते पुस्तक मागण्याचं धाडस मला झालं नाही; पण मी ते विकत घेतलं आणि झपाटल्यासारखं एका दमात वाचून काढलं. विषय खरोखरीच शिक्षकांना अंतर्मुख करणारा होता. मी लगेच त्या विषयावर एकांकिका लिहिली आणि ती मुलांकडून आंतरशालेय नाट्यस्पर्धेत सादर करून दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीसही मिळवलं. ‘कैफियत’ त्या एकांकिकेचं नाव.पण, तेवढ्यानं माझं समाधान झालं नाही. काही दिवसांनी मी अण्णांना भेटलो आणि ‘प्रिय बाई’ या विषयावर शैक्षणिक क्षेत्राला हादरा देणारा एक समस्याप्रधान चित्रपट काढता येईल, असा प्रस्ताव मांडला. अण्णा म्हणाले, पुस्तक वाचल्यावर माझ्याही मनात हा विचार आला होता; पण खरं सांगू, जवळपास हाच विषय घेऊन मी एक चांगला चित्रपट देण्याचा प्रयत्न केला होता. तुम्हाला आठवत असेल. ‘पायदळी पडलेली फुले’ हा तो चित्रपट; पण तो साफ पडला. तरीपण मी ते अपयश मानत नाही. बघूया आपण पुन्हा या विषयावर प्रयत्न करू.’ पण तो विषय तेवढ्यापुरता तिथल्या तिथंच राहिला; कारण अन्य चित्रपटांत अण्णा इतके व्यस्त झाले, की हा विषय अण्णांच्या मनात तसाच राहिला.- भालचंद्र कुलकर्णी
अण्णांनीच दिली पार्श्वगायनाची पहिली संधी---अनंत माने जन्मशताब्दी विशेष
By admin | Published: March 24, 2015 10:22 PM