अन्नपूर्णा शुगर अँड जागरी वर्क्स केनवडे (ता. कागल) प्रथम गळीत हंगाम शुभारंभः सर्वसामान्य शेतकऱ्यांनी उचललेला गोवर्धन म्हणजे अन्नपूर्णा साखर कारखाना
भूमिपुत्रांची स्वप्नपूर्ती म्हणजेच अन्नपूर्णा साखर कारखाना
कागल तालुक्यातील राजकीय आणि सामाजिक जडणघडणीत अनेक राजकीय नेत्यांचा सहभाग आहे पण खऱ्या अर्थाने कागलची ओळख ‘राजकीय विद्यापीठ’ म्हणून करून देणारे चार दिग्गज नेते आहेत त्यापैकी स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक, स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाटगे आणि विद्यमान ग्रामीण विकासमंत्री हसन मुश्रीफ व माजी आमदार संजयबाबा घाटगे यांचा समावेश आहे हे चारही नेते मास लिडर आहेत. हे नेते जर वेगवेगळ्या तालुक्यात जन्माला आले असते तर निश्चितच दोन दशके तरी आमदारकी शाबूत ठेवली असती, एवढे कर्तृत्व आणि नेतृत्व त्यांच्यामध्ये आहे. यामध्ये संजयबाबांची ओळख वेगळीच ती म्हणजे कोणती ही सत्ता, साधनसंपत्ती नसताना चाळीस वर्षे आपल्या नावाचे गारूड जनतेच्या हृदयावर ठेवले आहे. पाचवेळा पराभव पत्करूनही जनतेला दोष आणि शिव्या शाप न देता पुन्हा ते पूर्वीच्या जोमाने कार्यरत राहिले आहेत. दीड वर्षांचे आमदार आणि पंचायत समिती, जिल्हा परिषद, गोकुळ दूध संघ आदीवर नेतृत्व करण्याची संधी मिळताच त्यांनी या संधीचे सोने केले. हे एवढं सहज आणि सोपे असेल काय नक्कीच नाही. स्वतःचे दुःख दाबून ठेवून सामान्य जनतेच्या दुःखावर फुंकर मारणारे संजयबाबा व्रतस्थ राजकारणी आहेत; असेच म्हटले पाहिजे, अशा नेत्याने स्थापन केलेल्या अन्नपूर्णा साखर कारखान्याचा शुभारंभ म्हणजे टाकीचे घाव सोसणाऱ्या नेत्यांचा स्वप्नपूर्तीचा दिवस होय.
सामान्य शेतकऱ्यांनी उचललेला गोवर्धन म्हणजेच अन्नपूर्णा साखर कारखाना होय. त्यामुळे स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार मिळणार आहे. त्यामुळे भूमिपुत्रांचा साखर कारखाना म्हणजेच अन्नपूर्णा साखर कारखाना होय.
शुभारंभाच्या निमित्ताने कागल तालुक्यात कोल्हापूर जिल्हा सीमाभागातील सामान्य जनतेने आपल्या हक्काचा कारखान्याचे जे स्वप्न पाहिले त्याची ही स्वप्नपूर्ती आहे. कागल तालुक्यामध्ये पाचवा साखर कारखाना सुरू होत असून संजयबाबा गटातील कार्यकर्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्यामध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. केनवडेसारख्या भागात डोंगर फोडून कारखाना उभारण्यासाठी बाबांनी जिवाचे रान केले. गेले कित्येक दिवस कोरोनासारखी महामारी असतानासुद्धा रात्रंदिवस कार्यकर्ते व कामगारवर्ग शेतकरी यासाठी मेहनत घेत होते. कारखान्याची पूर्तता होत असताना सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. अन्नपूर्णा पाणीपुरवठा योजनेमुळे पांढऱ्यापट्ट्यातील गावांना मुबलक पाणी मिळू लागल्यामुळे उसाचे मळे तयार होऊ लागले आहेत त्यामुळे बाबागटाला साखर कारखान्याची गरज वाटू लागली. आजचा हा दिवस म्हणजे त्या गरजेचा सुवर्णक्षण म्हणावा लागेल. अत्याधुनिक यंत्रसामग्री, केमिकलविरहित प्रकल्प पंधराशे मेट्रिक टन प्रतिदिन ऊस गाळप करण्यासाठी सज्ज झाला आहे. तयार होणाऱ्या केमिकल फ्री साखर व गूळ पावडरची जागतिक बाजारपेठ तसेच भारतीय बाजारपेठेमध्ये प्रचंड मागणी आहे. त्यामुळे उसाला चांगला भाव मिळणार असून अत्याधुनिक यंत्रणेमुळे पर्यावरणास प्रदूषणाचा धोका असणार नाही, अशा या अन्नपूर्णा शुगर ॲन्ड जॅगरी वर्क्सचा गळीत हंगाम शुभारंभ कार्यक्रमास हार्दिक शुभेच्छा
शब्दांकन : सिद्राम मांडरेकर, जनसंपर्क प्रमुख, अन्नपूर्णा शुगर केनवडे, ता. कागल