साके : निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या स्वतःच्या हक्काच्या साखर कारखान्याची स्वप्नपूर्ती पूर्ण झाल्याचा आनंद असून, सर्वांच्या सहकार्याने अन्नपूर्णा साखर कारखाना नावारूपाला आणून इतर कारखान्यांच्या बरोबरीने ऊस दर देऊ, अशी ग्वाही केनवडे येथील अन्नपूर्णा शुगर अँड जागरी वर्क्सचे संस्थापक, माजी आमदार संजय घाटगे यांनी दिली. अन्नपूर्णाच्या पहिल्या चाचणी गळीत हंगामातील अकरा पोत्यांचे पूजन व गळीत हंगाम सांगता समारंभप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी ११ गूळ पावडर पोत्यांचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
घाटगे म्हणाले, कारखाना उभारणीपासून अनेक राजकीय, आर्थिक, नैसर्गिक संकटांशी सामना करीत आता प्रत्यक्ष उत्पादनास सुरुवात होत आहे. गूळ पावडर केमिकल फ्री असल्याने जागतिक बाजारपेठेत चांगली मागणी आहे. त्याचा फायदा येथील उत्पादक शेतकरी सभासदांना होणार आहे. पुढील वर्षी पूर्ण क्षमतेने कारखाना सुरू होईल, असा विश्वास देत घाटगे यांनी कारखाना पारदर्शीपणाने चालविला जाईल, अशी ग्वाही दिली. यावेळी संचालक शिवसिंह घाटगे, दत्तोपंत वालावलकर, अरुंधती घाटगे, जि. प. सदस्य अंबरीश घाटगे, धनाजी गोधडे, विश्वास दिंडोर्ले, के. के. पाटील, ए. वाय. पाटील, आनंदराव साठे, नाना कांबळे, भैरू कोराने, शिवाजी शेवडे, सूरजकुमार माने, विलास पोवार, आकाराम बचाटे, बंडा माने, ज्ञानदेव जाधव उपस्थित होते.
फोटो :१७ अन्नपूर्णा शुगर
ओळी : केनवडे, ता. कागल येते अन्नपूर्णा शुगर अँड जागरी वर्क्स गूळ पावडर पोत्यांचे पूजन व गळीत हंगाम सांगता समारंभप्रसंगी माजी आमदार संजय घाटगे यांनी मार्गदर्शन केले.