गेल्यावर्षी कोरोना नावाचा एक विषाणू आला आणि त्यानं जगण्याची पध्दतच बदलून टाकली. एरवी शासकीय असो किंवा खासगी, अगदी जवळ जाऊन, बसून बोलायची, अघळपघळ गप्पा मारायची सवय. मात्र कोरोनामुळे सगळं चित्रच बदललं. माणसा-माणसात प्लास्टिकच्या का असेनात, भिंती उभ्या करण्यात आल्या. या बदललेल्या परिस्थितीचा हा आढावा...
गेल्यावर्षी फेब्रुवारीनंतर भारतामध्ये कोरोनाचे रुग्ण सापडायला सुरुवात झाली आणि हा थुंकीवाटे पसरणारा विषाणू असल्याने, मग नागरिकांना खूपच बंधने घालून घ्यावी लागली. केंद्र असो वा राज्य, शासनाने यासाठी त्रिसूत्रीचा प्रभावी वापर करण्याच्या सूचना द्यायला सुरुवात केली. सामाजिक अंतर राखा, सॅनिटायझरचा वापर करा आणि मास्क वापरा... ही ती त्रिसूत्री.
तोंड आणि नाकावाटे म्हणजेच शिंकेद्वारे आणि तोंडातून बोलताना थुंकीचे तुषार उडतात. ते कसेही कुठेही उडतात. त्याचा नंतर स्पर्श होऊन त्याद्वारे कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी ही दक्षता घेण्याच्या सूचना करण्यात आल्या. आतापर्यंत प्राण्यांना मुसक्या बांधलेल्या आपण पाहत होतो. परंतु माणसाला आरोग्याच्यादृष्टीने मुसक्या जरी नसल्या तरी, मुखपट्टी बांधण्याचे जे बंधन तेव्हा घालण्यात आले, ते अजूनही सक्तीचे आहे. यापुढच्या काळातही याची अंमलबजावणी करावी लागणार असे दिसते.
आम्हा नागरिकांना याची सवय नसल्याने सुरुवातीला घुसमटल्यासारखे होऊ लागले. त्यामुळे टाळाटाळ सुरू झाली. बाहेर पडताना मास्क विसरला की रुमाल बांधायची वेळ आली. नागरिक तरीही दक्षता घेत नसल्याने अखेर महापालिका आणि पोलीस प्रशासनाने दंडाच्या पावत्या फाडायला सुरुवात केली. मग कुठे मास्क वापरण्यात नियमितता आली. आताही कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्याने मास्क हनुवटीवर ठेवून फिरणारे अनेकजण आहेत. आठवडा-आठवडाभर मास्क न धुणारेही अनेकजण आहेत. तसेच अनेक महिला बचत गटांनी आणि कंपन्यांनी रंगीबेरंगी मास्कचे उत्पादन सुरू केले. सर्जिकल मास्कपासून कापडी मास्कपर्यंतच्या उत्पादनातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल घडली.
सॅनिटायझरचा वापर, याचे एक बंधन घालण्यात आले. कुठेही गेटला, फर्निचरला लागलेले हात जर पुन्हा नाका-तोंडाला लागले, तर त्या माध्यमातून होणारा कोरोना प्रसार रोखण्यासाठी सातत्याने सॅनिटायझर वापरण्याचीही सक्ती करण्यात आली. अचानक ही मागणी वाढल्यामुळे बाजारात सॅनिटायझरची टंचाई निर्माण झाली. किमती वाढल्या. देशभरात अशी परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे साखर कारखान्यांनी सॅनिटायझर उत्पादन करावे यासाठी सूचना करण्यात आल्या. अनेक नव्या कंपन्या स्थापन झाल्या आणि एक, दोन महिन्यांनी सॅनिटायझर मुबलक प्रमाणात मिळू लागले. अनेक शासकीय आणि खासगी कार्यालयांमध्ये सॅनिटायझर घेऊन एका कर्मचाऱ्याला बसवण्यात येऊ लागले. त्यानंतर मग सॅनिटायझर स्टॅंड आले. नंतर त्यातही सुधारणा झाली. सेन्सरचा वापर करून, विशिष्ट ठिकाणी हात धरला की सॅनिटायझर हातावर पडू लागले. परंतु आता घरा-घरातही गेल्यानंतर सॅनिटायझर वापरण्याची सवय नागरिकांना लागली आहे. यामध्येही अनेक कंपन्यांनी संशोधन करून हे सॅनिटायझर सुगंधी करण्यास सुरुवात केली.
सामाजिक अंतर राखणे सुरुवातीला नागरिकांना अवघड गेले. परंतु जसजसे कोरोना रुग्णांचे आकडे वाढायला सुरुवात झाली आणि त्यानंतर मृत्यूही सुरू झाले, तेव्हा मात्र याचे गांभीर्य नागरिकांच्या लक्षात आले. साधा कोणाला ठसका लागला तरी, नागरिक त्याच्याकडे संशयाने पाहायला लागले. त्यावरूनही अनेक ठिकाणी भांडणे, वाद, मारामाऱ्या घडल्या. विविध कार्यालयांमधील बैठक रचनाच बदलण्यात आली. ज्या ठिकाणी १० खुर्च्या होत्या, त्या ठिकाणी पाचच खुर्च्या ठेवण्यात आल्या.