कोल्हापूर : आंतरराष्ट्रीय फळे व पालेभाज्या संवर्धन वर्षाचे औचित्य साधून येथील निसर्गमित्र संस्थेतर्फे रंगपंचमीनिमित्त ऑनलाईन पद्धतीने आयोजित केलेल्या विविध स्पर्धांचे निकाल जाहीर करण्यात आले असून, या स्पर्धेत जिल्ह्यातील १०९ स्पर्धक सहभागी झाले होते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा सार्वजनिक ठिकाणी रंगपंचमी साजरी करता येणार नव्हती; त्यामुळे निसर्गमित्र संस्थेने शुक्रवारी (दि. २) विविध स्पर्धांचे आयोजन केले होते. सोशल डिस्टन्सिंगचा विचार करून घरच्या घरीही प्रतीकात्मक पद्धतीने रंगपंचमीचा सण साजरा करावा आणि घरातील सर्व सदस्यांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, हा या स्पर्धेमागचा हेतू होता. वनस्पतिजन्य रंग वापरून रांगोळी काढणे, वनस्पतिजन्य खाद्यरंगांपासून खाद्यपदार्थ तयार करणे आणि बालमित्रांसाठी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारी चित्रे काढणे अशा स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेचे परीक्षण सर्वश्री. पराग केमकर, सतीश वडणगेकर, राणिता चौगुले यांनी केले.
विजेत्या स्पर्धकांच्या घरी जाऊन गुरुवार, दिनांक ८ एप्रिल रोजी सायंकाळी चार ते आठ या वेळेत संस्थेचे सदस्य बक्षीस देणार आहेत. बहुगुणी शेवगा पुस्तके, काश्मीरचे केशर, हातसडीचा तांदूळ, करवंदांचे लोणचे असे बक्षिसांचे स्वरूप आहे. तसेच स्पर्धकांना वनस्पतिजन्य रंगांनी तयार केलेल्या साखरेची माळ देण्यात येणार आहे.
निकाल पुढीलप्रमाणे : चित्रकला स्पर्धा : सोहम कुंभार आणि अर्चिषा सातवेकर (प्रथम क्रमांक विभागून). संस्कृती सूर्यवंशी (द्वितीय), स्वरा नीलेश साळोखे (तृतीय), प्रज्वल सकटे आणि समीक्षा चव्हाण (उत्तेजनार्थ).
रांगोळी : कविता पवार (प्रथम), संजय शिंदे (द्वितीय), शिवराई यादव (तृतीय).
पाककृती : राधिका धर्माधिकारी (प्रथम), सीमा पाटील (द्वितीय), वैष्णवी दबडे (तृतीय).
(संदीप आडनाईक)