कोल्हापूर : महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपला विजयी करा, आम्ही कोल्हापूरला स्मार्ट सिटी करतो, असे आश्वासन देऊन भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी कोल्हापूरकरांची बोळवण केली आहे. दानवे यांनी निवडणुकीपुर्वी कोल्हापूरचा समावेश स्मार्ट सिटी योजनेत केल्याचे जाहीर करावे, आम्ही कॉँग्रेसचे उमेदवार न देता निवडणुकीतूनच माघार घेतो, असे उघड आव्हान जिल्हा कॉँग्रेसचे अध्यक्ष पी. एन. पाटील यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिले. वास्तविक भाजपची सत्ता राज्यात, केंद्रात आहे. भाजप प्रदेश अध्यक्ष दानवे आश्वासन न देता कोल्हापूरचा समावेश स्मार्ट सिटीत करूनच जनतेसमोर गेले असते तर बरे झाले असते. आजही वेळ गेलेली नाही. त्यांनी स्मार्ट सिटी योजनेत कोल्हापूरचा समावेश केल्याचे जाहीर करावे, आम्ही निवडणुकीतून माघार घेतो, असे पी. एन. पाटील म्हणाले. भाजपची लाट ओसरली आहे. आता कोणतीही लाट राहिलेली नाही, अशी टिप्पणीही त्यांनी जोडली. कॉँग्रेस पक्षाने जी आश्वासने दिली, ती पूर्ण केली. काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजना नुसती मंजूरच केली नाही, तर प्रत्यक्ष निधी आणून कामालाही सुरुवात केली. भाजप जशी बोळवण करीत आहे, तसे कॉँग्रेस पक्षाने केलेले नाही. योजना आणली, जनतेची अनेक वर्षांची मागणी पूर्ण केली, असेही पाटील म्हणाले. (प्रतिनिधी)
स्मार्ट सिटी जाहीर करा, काँग्रेस माघार घेईल!
By admin | Published: September 16, 2015 1:02 AM