कोल्हापूर : गाईच्या दुधास बोनस देण्यास नकार देणाऱ्या गोकुळ दूध संघासमोर गुरुवारी मिरजेमधील दूध उत्पादकांनी एकत्र जमून संताप व्यक्त केला. संघाचे चेअरमन रवींद्र आपटे यांनी संघाला परवडत नसल्यानेच हा निर्णय घेतला आहे; तथापि आपल्या भावना २२ आॅक्टोबरला होणाऱ्या संचालकांच्या बैठकीसमोर मांडू, असे आश्वासन दिल्यानंतर उत्पादक सभासदांनी आंदोलन मागे घेतले.मिरज येथील मोहनराव शिंदे संघामार्फत ६० उत्पादकांकडून रोज ३५० लिटर गाईच्या दुधाचा पुरवठा गोकुळ दूध संघास गेल्या नऊ वर्षांपासून होतो. ‘गोकुळ’कडून त्यांना दरवर्षी दिवाळीच्या आधी एक रुपया पाच पैसे याप्रमाणे बोनसही दिला जातो.
यावर्षी कोल्हापूरमधील उत्पादकांना तो दिला आहे; पण मिरजेमधील उत्पादकांना दिला नसल्याचे लक्षात आल्याने याचा जाब विचारण्यासाठी मिरजेमधील सभासदांनी गुरुवारी दुपारी कोल्हापुरात ताराबाई पार्कातील ‘गोकुळ’चे कार्यालय गाठले.
नंदकुमार देशमुख यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने चेअरमन आपटे यांच्यासमोर व्यथा मांडल्या. यावर आपटे यांनी दूध पावडरमधून संघाला तोटा झाला आहे. शासनाकडूनही मदत नाही; त्यामुळे कोल्हापूर वगळता अन्य बाहेरच्या जिल्ह्यांना बोनस द्यायचा नाही, असा निर्णय घेतला असल्याचे समजावण्याचा प्रयत्न केला; पण उत्पादकांनी मात्र बोनसचा आग्रह कायम ठेवला. यावेळी प्रताप रजपूत, पांडुरंग रजपूत, सुनील पाटील, मकरंद शिंदे, महादेव रजपूत, पोपट शिंदे, संदीप चंदनशिवे हे उत्पादक सभासद उपस्थित होते.दरम्यान, या संदर्भात देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी बोनस देणे जर ‘गोकुळ’ला परवडत नसेल तर आम्हांलाही संघाला दूध घालणे परवडत नाही. आतापर्यंत ‘गोकुळ’ने खूप चांगले सहकार्य केले आहे; पण येथून पुढे जो संघ बोनस देईल, सुविधा पुरवेल त्यांनाच दूध घालणार आहोत, असे स्पष्ट केले.