कोल्हापूर : आरक्षणाच्या मुद्द्यावरून निवडणुकीपूर्वीच मराठा समाजाचे आंदोलन उग्र व्हावे; त्यातून ओबीसी व मराठा समाज यांच्यात वाद निर्माण व्हावेत, त्यातून ओबीसींच्या मतांचे धु्रवीकरण होऊन त्याचा फायदा भाजपला व्हावा, या उद्देशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ७२ हजार पदांची नोकरभरती जाहीर केली आहे, असा आरोप ‘बामसेफ’चे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी रविवारी केला.कोल्हापूर येथे ‘बामसेफ’च्या ३२ व्या महाराष्ट्र राज्य अधिवेशनात मेश्राम म्हणाले, संसदेत अविश्वास ठरावावेळी शिवसेनेने भाजपाला मतदान केले नाही; त्यामुळे २०१९ च्या निवडणुकीत सेना आपल्याबरोबर असणार नाही. त्यामुळे मतांचे विभाजन होणार आहे. त्यात मराठा समाजाची मतेही मिळणार नाहीत. मग ओबीसींची तरी मते मिळतील. याकरिता निवडणुकीपूर्वीच ७२ हजार पदांची भरती करण्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केले आहे. त्यातून मराठा समाजाचेही आंदोलनही उग्र होईल. परिणामी ओबीसी व मराठा समाजामध्ये वाद निर्माण होतील. ओबीसींचे धुव्रीकरण होऊन ते भाजपाच्या बाजूने उभे राहतील. खरे पाहता मराठा समाजालाही आरक्षणाचा लाभ मिळाला पाहिजे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या संघर्षामुळे ७ आॅगस्ट १९३२ रोजी इंग्रज सरकारने शेड्युल्ड कास्टस आणि शेड्युल्ड ट्राईबना मान्यता दिली. त्यानंतर १६ नोव्हेंबर १९९२ ला ओबीसींना आरक्षण मंजूर झाले. ओबीसींच्या हक्कासाठी डॉ. बाबासाहेबांनी संसदेत आवाज उठविला होता, असेही त्यांनी सांगितले.
Maratha Reservation: मराठा आंदोलन उग्र होण्यासाठीच नोकरभरती जाहीर - वामन मेश्राम
By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2018 4:52 AM