कोल्हापूर : तनिष्क ज्वेलर्स चोरीप्रकरणी अटकेतील चौघा परप्रातीयांकडून पोलिसांनी आणखी दहा तोेळे सोन्याचे दागिने हस्तगत केले. गेल्या दोन दिवसात त्यांच्याकडून एकूण ११ लाख रुपयांचे सुमारे २० तोळे सोन्याचे दागिने पोलिसांनी जप्त केले. गुजरीतीलही आणखी एका सराफ दुकानातून सुमारे १७ ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांची चोरी या चौघा संशयिताकडून उघडकीस आली.
दरम्यान, अटक केलेल्या एजाज रियाझ खान (वय ३३, रा. बेंगलोर), संजू रवींद्र गुप्ता (३५, रा. उत्तर प्रदेश), सरिता राजाराम शर्मा (२५), आयुषी गुलाब शर्मा (२५, दोघीही रा. उत्तर प्रदेश. सध्या रा. मुंबई) या चौघांना गुरुवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, अटक केलेल्या चौघांना तपासासाठी लक्ष्मीपुरी पोलिसांकडे वर्ग करण्यात आले.
मंगळवारी (दि. ५ जानेवारी) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास दसरा चौकातील तनिष्क ज्वेलर्स या दुकानात ग्राहक म्हणून आलेल्या तीन महिलांनी सुमारे ३७ ग्रॅम ७०० मि.लि. वजनाच्या एकूण दोन सोन्याच्या बांगड्या हातोहात लंपास केल्या. स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने तातडीने शोधमोहीम राबवून चौघा परप्रातीयांना शाहूपुरीतील एका हॉटेलवर छापा टाकून अटक केली. त्यांच्याकडून १०५ ग्रॅम सोन्याचे दागिने व मोटार वाहन असा सुमारे ११ लाखाचा मुद्देमाल जप्त केला होता. यातून पुण्यातील दोन चोऱ्या उघडकीस आल्या होत्या.
गुुरुवारी त्यांच्याकडे अधिक चौकशी करता, चौघा संशयितांकडून गुजरीतील एका सराफ दुकानातील सुमारे १७ ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांवर हात मारल्याचे उघड झाले. त्याचा गुरुवारी लक्ष्मीपुरी पोलिसात गुन्हा दाखल झाला. तसेच पुण्यातील कोरेगाव पार्क व हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तनिष्क ज्वेलर्स या शोरूममधील आणखी काही दागिने संशयितांनी चोरल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार संशयितांकडून चोरीतील एकूण ११ लाख रुपये किमतीचे २० तोळे (२०० ग्रॅम) सोन्याचे दागिने तसेच चारचाकी वाहन जप्त करण्यात आले आहे.