कोल्हापूर : कोरोनाबाधित रुग्णसंख्येत चढउतार होत असल्याने धाकधूकही कायम आहे. गुरुवारी नव्याने १६११ बाधित आढळले, तर ३० जणांचा मृत्यू झाला, त्यांतील एक वाळवा तालुक्यातील सोडला उर्वरित २९ जण कोल्हापुरातील आहेत; त्यामुळे अजूनही मृत्युदर जास्त असल्याने चिंताही कायम आहे.
जिल्ह्यात गुरुवारी १५ हजार ६११ जणांची स्वॅब तपासणी झाली. सायंकाळी पाचपर्यंत आलेल्या अहवालानुसार १६११ नवे बाधित आढळले. बुधवारी (दि. ७) बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांचे प्रमाण जास्त होते, गुरुवारी पुन्हा यात घट होऊन ती संख्या १३४६ वर आली. हा दर ८९.१८ टक्के आहे. दरम्यान, सर्वच दुकाने खुली सुरू करण्यास दिलेल्या सवलतीला आज, शुक्रवारी पाच दिवस होत आहेत. या पाच दिवसांत रुग्णसंख्येतील चढउतार कायम असल्याने ही सवलत पुढे सुरू राहणार की बंद याबाबत आज होणाऱ्या निर्णयांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवाय जिल्ह्याचा पाॅझिटिव्हिटी दर किती असेल याचाही राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून येणारा अहवालही आजच येणार असल्याने याकडेही संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
सवलतीच्या या पाच दिवसांत रुग्णसंख्या व मृत्यूही बऱ्यापैकी जैसे थे राहिल्याचे दिसत आहे. त्यामुळे बाधितांची संख्या एक हजाराच्याही खाली येण्यासाठी आणखी किती दिवस वाट पाहावी लागेल हे सांगता येत नाही. त्यातच कोविड लस उपलब्ध झाल्याने लसीकरणासाठी सरकारी केंद्रांवर गर्दी उसळली आहे. रांगा लावताना कोणत्याही प्रकारचे सोशल डिस्टन्स पाळले जात नसल्याने यातून पुन्हा संसर्ग वाढला तर काय याचीही चिंता लागून राहिली आहे.
आज झालेले मृत्यू
कोल्हापूर शहर : ८ नाना पाटीलनगर, मुक्त सैनिक वसाहत, कसबा बावडा, जरगनगर, सुभाषनगर, शांती उद्यान, राजोपाध्येनगर, अयोध्या टॉवर्स.
करवीर : ५ भुयेवाडी, कळंबा, नेर्ली, गोकुळ शिरगाव, शिये,
कागल : ३ करनूर, व्हन्नाळी, मुरगूड
हातकणंगले : ५ पेठवडगाव, आळते, मिणचे, माणगाव, चंदूर.
भुदरगड : २ भुदरगड, महालवाडी
राधानगरी : १ शिरगाव.
आजरा : १ पेरणोली.
शिरोळ : १ जैनापूर.
पन्हाळा : २ गोठे, पडळी
इतर जिल्हा : १ कंदलगाव (ता. वाळवा).