कोल्हापूर : कोरोनाची रुग्णसंख्या कमी होण्याऐवजी वाढतच आहे. रुग्णालये भरली आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिकेतर्फे तातडीची रुग्णालये सुरू करण्यात येत आहेत. शिवाजी विद्यापीठ एनसीसी ऑफिसशेजारील वसतिगृहात ४५० बेड क्षमता असणारे कोरोना केअर सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. आज शुक्रवारी त्यांपैकी १५० बेड कार्यान्वित केले आहेत.कोल्हापूरमध्ये गेल्या १५ दिवसांत ४०० पेक्षा जास्त कोरोनाचे नवीन रुग्ण आढळून आले. यामुळे महापालिका, जिल्हा प्रशासन यांच्यावर प्रचंड ताण आला आहे. नियोजनानुसार सध्या सर्व रुग्णालये भरली आहेत.. नवीन येणारे रुग्ण, संपर्कातील नातेवाईक यांना कुठे ठेवायचे हा मोठा प्रश्न आहे. महापालिकेकडून यावर युद्धपातळीवर उपाययोजना केली जात आहे.
चार दिवसांपूर्वीच शिवाजी विद्यापीठ डी ओ टी विभागात ३५० बेडचे हॉस्पिटल सुरू केले. सध्या २०० रुग्ण येथे उपचार घेत आहेत. शहरात वाढता रुग्णांची संख्या पाहता महापालिका शिवाजी विद्यापीठ एन सी सी ऑफिस परिसरातील वसतिगृहात आणखी एक रुग्णालय सुरू करीत आहे.
वाढत्या रुग्णसंख्येचा विचार करून येथे ४५० बेडचे कोरोना केअर सेंटर सुरू केले आहे. १५० बेड पहिल्या टप्प्यात होणार आहेत. यामध्ये लक्षणे नसणाऱ्या रुग्णांवर उपचार होणार आहे. ऑक्सिजन सिलिंडरसह तीन शिफ्टमध्ये येथे वैद्यकीय पथक नियुक्त करणार आहेत.- निखिल मोरे, उपायुक्त, कोल्हापूर महापालिका