कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यासाठी गुरुवारी कोविशिल्डचे ८० हजार ७५० डोस उपलब्ध झाले आहेत, यापैकी २ हजार ८०० लस या दिव्यांग आणि परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाने दिली. लसीकरणासाठी दुसरा डोस असलेल्या ४५ वर्षांवरील नागरिकांना प्राधान्य देण्यात येणार असून त्या आवश्यकतेनुसार लसीचा कोटा ठरवण्यात आला आहे.
लसीचा पुरवठा कमी प्रमाणात होत असल्याने मागील दोन महिन्यात जिल्ह्यातील लसीकरणाचा वेग मंदावला होता. मात्र मागील आठवड्यापासून लसींचा पुरवठा वाढला आहे. गुरुवारीदेखील जिल्ह्यासाठी ८० हजारावर कोविशिल्डचे डोस मिळाले. जिल्ह्यातील १२ तालुक्यांमधील लोकसंख्येच्या निकषानुसार या लसीचे वितरण करण्यात आले आहे. त्यापैकी कोल्हापूर महापालिका क्षेत्रासाठी ९ हजार ५००, सीपीआर रुग्णालयासाठी ५५०, बावड्यातील सेवा रुग्णालयासाठी ८०० डोस मिळाले आहेत. लसींचा पुरवठा वाढल्याने आता जिल्ह्याचे लसीकरण वेगाने होणार आहे.
---
तालुका : डोसचे वितरण
हातकणंगले : १५ हजार ८४०
करवीर : ८ हजार ४१०
शिरोळ : ७ हजार २२०
गडहिंग्लज : ५ हजार ८७०
राधानगरी : ४ हजार ७९०
चंदगड : ४ हजार ६९०
पन्हाळा : ४ हजार ५००
कागल : ४ हजार ४८०
शाहूवाडी : ४ हजार १९०
भुदरगड : ३ हजार ३३०
आजरा : ३ हजार
गगनबावडा : ७८०
--