कोल्हापूर: स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे यांनी अखेर भाजपमध्ये प्रवेश केला आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी झालेल्या महायुतीच्या मेळाव्यात प्रवेशाची औपचारीकता पूर्ण करण्यात आली.
काटे यांच्या जाण्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या महिनाभराच्या अंतरात दुसरा मोठा धक्का बसला आहे. या प्रवेशाचे सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत असलेतरी त्यांची भाजपशी आणि सदाभाऊ खोत यांच्याशी असलेली जवळीकच त्याला कारणीभूत ठरली आहे.काटे हे शेतकरी चळवळीत गेल्या ३0 वर्षापासून कार्यरत आहेत. शरद जोशींच्या शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष म्हणून ते कोल्हापुरात काम करत होते. राजू शेट्टी यांनी जोशी यांच्याशी फारकत घेऊन २00२ मध्ये कोल्हापुरात स्वाभिमानी शेतकरी संघटना काढली. तेव्हापासून काटे हे शेट्टी यांच्यासोबतच होते. २00२ ते २0१९ अशी गेली १७ वर्षे ते स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष म्हणूनच संघटनेची धुरा सांभाळली.
ऊस आणि दूध आंदोलनासह जिल्हा परिषदेतील सत्तेसह आमदारकी आणि खासदारकी, मंत्रीपदे या संघटनेच्या चढत्या आलेखाचे ते एकमेव साक्षीदार होते. राजू शेट्टी यांचे अत्यंत विश्वासू असलेले काटे हेच संघटनेचे सर्वेसर्वा होते.
पण २0१४ मध्ये महायुतीमध्ये गेल्यापासून काटे यांची भाजपशी जवळीक वाढली होती. त्यातूनच त्यांना कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत स्विकृत संचालकपदही मिळाले होते. तुपकर व सदाभाऊ यांच्या मंत्रीपदाचे काटे हे देखील भागीदार होते. या दोघांनीही संघटना सोडली आहे. या दोघांशी काटे यांचे असलेली जवळीकच त्यांना संघटनेपासून लांब घेऊन गेली आहे.काटे यांचा गनिमा कावागनिमी कावा हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या लढ्याचे प्रमुख शस्त्र राहिले आहे. याच शस्त्राचा आधार स्वत: काटे यांनीच घेतल्याचे दिसत आहे. तुपकर यांनी संघटना सोडण्यापुर्वी राजू शेट्टी यांच्याशी चर्चा केली होती, पण काटे यांनी कोणाशी साधी चर्चाही न करता सर्वानाच अंधारात ठेवून अचानकपणे भाजपच्या व्यासपीठावर एन्ट्री घेतली. याचा संघटनेतील सर्वच कार्यकर्त्यांना धक्का बसला आहे.
काटे यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याने संघटना सोडणे हे धक्कादायक आणि क्लेषदायक आहे. चळवळ अडचणीत असताना पाय रोवून उभे राहण्याऐवजी संघटना आणि शेतकरी चळवळीलाही वाऱ्यावर सोडले आहे.प्रा. जालंदर पाटील, स्वाभिमानी प्रदेशाध्यक्ष