कोल्हापूर : कळंबा मध्यवर्ती कारागृहात संरक्षण भिंतीवरून बेकायदेशीरपणे मोबाईल व गांजा फेकणाऱ्या गन्हेगारी टोळीला सहकार्य केल्याबद्दल जुना राजवाडा पोलिसांनी आणखी एकास अटक केली.
शुभम सोपान ऐवळे (वय २३, रा. शहापूर, इचलकरंजी) असे त्याचे नाव आहे. तसेच बुधवारी अटक केलेला पैलवान ऋषिकेश सदाशिव पाटील (रा. कोदवडे, ता. राधानगरी) याला न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कळंबा मध्यवर्ती कारागृहातील भींतीवरुन बेकायदेशीरपणे मोबाईल, गांजा फेकणाऱ्या चौघा गुन्हेगारांच्या टोळीचा पर्दाफाश झाला. त्यापैकी ऋषिकेश पाटील याला बुधवारी पोलिसांनी अटक केली. त्यानंतरच हे सत्य बाहेर पडले.
या टोळीतील भिष्म्या ऊर्फ भीम्या सुभेदार चव्हाण (रा. रांजणी, ता. कवठेमहांकाळ, जि. सांगली), राजेंद्र ऊर्फ दाद्या धुमाळ (रा. रेल्वे स्टेशननजीक, जयसिंगपूर), जयपाल किसन वाघमोडे (रा. वडिये, ता. कडेगाव, जि. सांगली, सध्या रा. गंगावेश, कोल्हापूर) यांचा पोलीस शोध घेत आहेत. पण या गुन्हेगारांच्या टोळीला सहकार्य केल्याबद्दल जुना राजावाडा पोलिसांनी गुरुवारी रात्री शुभम ऐवळे याला इचलकरंजीत अटक केली आहे.