कोल्हापूर : चुकीच्या स्वाक्षरीचा धनादेश देऊन मोटारकार नेऊन मालकाची फसवणूक केल्याप्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात संशयित नरेंद्र पटेल (रा. शिवाजी पेठ) याच्यावर आणखी एक गुन्हा दाखल झाला.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, तेजस कृष्णांत बुडके (रा. मेन रोड बालिंगा, ता. करवीर) यांनी त्यांची मोटारकार विक्रीची ऑनलाइनवर जाहिरात दिली होती. ती पाहून संशयित आरोपी नरेंद्र हा दि.२५ जून रोजी दुपारी त्यांच्या घरी गेला. त्याने त्या मोटारीचा खरेदी व्यवहार ४ लाख ३५ हजार रुपयांना ठरवला. त्यानंतर त्याने त्या रकमेचा पत्नी प्रिया नरेंद्र पटेल या नावे बँकेतील धनादेश दिला. त्यानंतर बुडके यांनी त्याला नागाळा पार्क येथे जाऊन आपल्या मोटारीचा ताबा दिला. दुसऱ्या दिवशी धनादेश बँकेत जमा केला; पण त्यावर चुकीची स्वाक्षरी असल्याने तो वटला नाही; पण त्यानंतर नरेंद्रने मोटारकार व पैसे देण्यास टाळाटाळ केल्याची तक्रार बुडके यांनी करवीर पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार नरेंद्र पटेल याच्यावर करवीर पोलिसांत गुन्हा दाखल झाला. यापूर्वी त्याच्यावर जुना राजवाडा व शाहूपुरी पोलीस ठाण्यात फसवणूक करून वाहन नेल्याचे गुन्हे दाखल आहेत.