इचलकरंजी : येथील नदीवेस परिसरातील एका ७० वर्षीय वृद्धाचा ह्यकोरोनाह्ण अहवाल सोमवारी पॉझिटिव्ह आल्याने प्रशासनासह शहरवासीयांत खळबळ उडाली. प्रशासनाने या परिसरात आवश्यक उपाययोजना युद्धपातळीवर सुरू केल्या असून, संबंधित व्यक्तीच्या कुटुंबातील चौघांना तपासणीसाठी आयजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. इचलकरंजीतील पॉझिटिव्ह संख्या तीनवर पोहचली असून, त्यातील एकजण मरण पावला आहे.
विशेष म्हणजे पॉझिटिव्ह आढळलेला रुग्ण हा गेल्या महिन्याभरात कोठेही बाहेरगावी प्रवास केल्याचे अद्याप स्पष्ट झाले नाही. त्यामुळे त्याला लागण कशामुळे झाली, याची माहिती घेण्याचे काम प्रशासनाकडून सुरू आहे. त्याला उच्च रक्तदाब व फुफ्फुसाचा त्रास आहे. हा व्यक्ती त्रास होत असल्याने २ मे रोजी पहाटे आयजीएम रुग्णालयात तपासणीसाठी म्हणून आला होता. त्यावेळी त्याला दाखल करून घेतले. परंतु त्याचा त्रास वाढल्याने त्याला त्याचदिवशी सीपीआर रुग्णालयात हलविण्यात आले होते. रविवारी (दि.३) त्याचा स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आला.
याचा सोमवारी दुपारी अहवाल पॉझिटिव्ह आला. दरम्यान, ह्यत्याह्ण व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्यांसह संपर्कातील व्यक्तींचे स्त्राव घेवून तपासणीसाठी पाठविण्यात येत आहेत. त्यांच्या शेजारचे एक कुटुंब त्यांच्या संपर्कात आले आहे. त्याचबरोबर संबंधित रुग्ण चार दिवसांपूर्वी सुतार मळा परिसरातील एका दुकानात बसायला जात होता. त्यामुळे त्या दुकानदारासह अन्य संपर्कात आलेल्या व्यक्तींचीही तपासणी करण्यात येणार आहे.
पॉझिटिव्ह आढळलेला व्यक्ती सिकंदर दर्गामागे मुजावर पट्टी नदीवेस नाका या परिसरातील असल्याने तेथून ३०० मीटर अंतरापर्यंतच्या चारही बाजूंच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत. तसेच प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांनी संबंधित क्षेत्र प्रतिबंधित घोषित केले आहे.
शहरातील ह्यकोरोनाह्ण पॉझिटिव्हची संख्या तीनवर पोहचली असून, त्यातील एका साठ वर्षीय वृद्धाचा तीन दिवसांपूर्वी मृत्यू झाला. तर एका चार वर्षीय बालकावर आयजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यानंतर नदीवेस परिसरातील हा तिसरा रुग्ण नव्याने आढळल्यामुळे इचलकरंजीत भीतीचे वातावरण पसरले आहे. परिसराला पोलिस उपअधीक्षक गणेश बिरादार यांच्यासह विविध अधिकाऱ्यांनी भेटी दिल्या.भागात औषध फवारणीसंबंधित परिसरात नगरपालिकेच्यावतीने औषध फवारणी करण्यात आली असून, बारा पथके स्थापन करून आज, मंगळवार सकाळपासून घर टू घर सर्व्हे सुरू करण्यात येणार आहे. त्याचबरोबर परिसरातील सर्वांना आरोग्य सेतू अॅप वापरण्यास सूचना देण्यात येणार आहेत, अशी माहिती आरोग्य अधिकारी डॉ. सुनीलदत्त संगेवार यांनी दिली.