संगीत नाट्य स्पर्धेत सं. मत्स्यगंधा हे सादर झालेले तेरावे नाटक. हे नाटक स्पर्धेत दुसऱ्यांदा सादर झाले. सहयोग, रत्नागिरीने हे नाटक सादर केले. नाटकाची सुरुवात ओंकारम वाणी या नांदीने झाली. पडदा उघडल्यानंतर अप्रतीम नेपथ्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.नाटकातील प्रमुख भूमिका सिद्धी बोंद्रे (सत्यवती) यांनी रंगवली. बोंद्रे यांचा आवाज गोड व सुरेल होता. त्यामुळे सत्यवतीच्या तोंडी असलेली काहीशी भावगीतांच्या अंगाने जाणारी पदे चांगली सादर केली. परंतु सत्यवतीचा अल्लडपणा, खट्याळपणा भूमिकेत कमी जाणवला. पायातील चाळांचा वापर केला असता, तर अधिक मजा आली असती. तिसऱ्या अंकात वाढलेल्या वयाचा रंगभूषा, केशभूषा व वेशभूषा याव्यतिरिक्त कुठेही परिणाम दिसला नाही. आवाज, देहबोली, ताठा यामध्ये पहिल्या अंकातील सत्यवती डोकावत होती.कैलास खरे यांनी पराशराची भूमिका केवळ आवाजाच्या जोरावर पार पाडल्याचे जाणवले. गळ्याची तयारी नसताना केवळ आवाजाच्या जोरावर पदे म्हटली. देवाघरचे ज्ञात कुणाला, गुंतता हृदय हे, नको विसरु संकेत मिलनाचा, साद देत हिमशिखरे या पदांमध्ये छोट्या छोट्या ताना आहेत. त्या बेसूर होत होत्या. आवाजात कंप आणून ती पदे सादर करताना बोलतानाचा प्रयत्न असफल झाला. देवाघरचे कमलदलाच्या मनासी, कैलासाचा या शब्दांवर छोट्या ताना असल्यामुळे पदे गाताना कसरत होत होती.स्वप्न रंगले रात्री धुंद प्रेमिकांचे या ओळींवर व्हरायटी होताना नृत्याचे हावभाव केले, ते पराशराच्या भूमिकेशी विसंगत होते. विकास फडके (चंडोल) यांचा चंडोल खूपच विसंगत रंगवला गेला. लहू घाणेकर (धीवर) व विकास फडके यांच्या भूमिकेमध्ये अभिनय खूपच कमी पडला. धीवराने बरेचसे संवाद खाली बघूनच म्हटले. समोर किंवा प्रेक्षकांकडे बघणे ते टाळत होते.संकेत चक्रदेव (प्रियदर्शन), राम तांबे (शंतनु) यांनी आपल्या भूमिका चांगल्या निभावल्या. भाग्यश्री अभ्यंकर (अंबा) यांचा अभिनय कमी पडला. राम तांबे यांनी संसार सुख नसे भाळी व स्त्री प्रेमावीण जीवन अवघे ही पदे चांगली पेलली.कैलास खरे (पराशर), सिद्धी बोंद्रे (सत्यवती), प्रवीण दामले (देवव्रत), लहू घाणेकर (धीवर) यांचे संवाद म्हणताना शब्द अडखळत होते.तिसऱ्या अंकामध्ये प्रवीण दामले (देवव्रत) पूर्णपेण संवाद विसरले. पुढचे संवाद आठवण्यासाठी मागचे संवाद परत म्हणण्याची वेळ आली, हा प्रसंग खूपच दुर्दैवी होता.या नाटकामध्ये अंबा-भीष्म, सत्यवती-भीष्म व भीष्म चंडोल यांचे काही संवाद नाटकातील मर्मस्थाने म्हणून ओळखले जातात. ते अपेक्षितपणे सादर झाले नाहीत.नाटकाची संगीत साथ सुंदर होती. संतोष आठवले (आॅर्गन), राजू जोशी (तबला), नितीन देशमुख (व्हायोलीन) यांनी समर्पक साथसंगत केली. राजू जोशी यांचा तबला बोलत होता, अशी प्रतिक्रिया रसिकांमधून उमटली.नेपथ्य, वेशभूषा, रंगभूषा, प्रकाशयोजना या नाटकाच्या जमेच्या बाजू होत्या. पार्श्वसंगीताचा अजून विचार व्हायला हवा होता, असे वाटले नाटकातील चढ उतार लक्षात घेता टीमवर्क म्हणून या नाटकाचा प्रयत्न कौतुकास्पद होता.संध्या सुर्वे
‘सहयोग’ने केला मत्स्यगंधाचा दुसरा प्रयोग
By admin | Published: February 01, 2015 9:07 PM