भीमगोंडा देसाई कोल्हापूर : जिल्हा परिषदेत सदस्य नाहीत तरीही सभागृहाच्या नूतनीकरणाच्या नावाखाली तब्बल दीड कोटी उधळले जात आहेत. नूतनीकरण करण्याइतकी सभागृहाच़ी वाईट अवस्था झाली नसतानाही ऐन लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेत कामाला सुरुवात केली आहे. दीड कोटीत तब्बल ६० लाख इलेक्ट्रिक साहित्यावर खर्च केले जाणार आहेत. पाच वर्षापूर्वी याच सभागृहाचे नूतनीकरण झाले आहे. आता पुन्हा नूतनीकरणाच्या नावाखाली पैसे मुरवण्यासाठीच काम काढले आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.केंद्र, राज्य शासन, स्वनिधीतून जिल्ह्यातील ग्रामीण भागाचा विकास करण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेवर आहे. अनेक वाड्या, वस्त्या मूलभूत सुविधांपासून लांब आहेत. धनगरवाड्यांपर्यंत जाण्यासाठी रस्ते नाही. पुरेशा प्रमाणात स्वच्छ पिण्याचे पाणी नाही. यासाठी जिल्हा परिषदेने स्वनिधी खर्च करण्यासाठी सदस्यच नाहीत, सभागृह अस्तित्वात नाही तरीही नूतनीकरणावर तब्बल दीड कोटी रूपये खर्च केले जाणार आहेत.याच सभागृहाच्या नूतनीकरणावर पाच वर्षापूर्वी एक कोटींवर पैसे खर्च करून अलिशान बैठक व्यवस्था, विद्युतीकरण करण्यात आले होते. सभागृह चकाचक होते. तरीही पुन्हा नूतनीकरण केले जात आहे. नूतनीकरणातील कामावर खर्च करण्यात येणारा निधी अक्षरश: डोळे दीपवणारा आहे. गेल्या दहा वर्षात सभागृहावर झालेल्या खर्चात नवीन सभागृहाची इमारत बांधून झाली असती असाही सूर आता उमटत आहे.
कशावर किती खर्च ?पहिल्या टप्यात सभागृहाची दुरूस्ती, जुने साहित्य काढणे, पायऱ्या तयार करणे, बैठक व्यवस्था, नवीन फरशीकाम करण्यावर ४० लाख, दुसऱ्या टप्यात फर्निचर, सभागृहातील टेबल, खुर्च्या, व्यासपीठ सुधारणा, इतर फर्निचरसाठी तब्बल ५० लाख, सभागृहात एलईडी स्क्रिन, डिजिटल साऊंड सिस्टिम बसवणे, इको सिस्टिम, विद्युतीकरणासाठी ६० लाख अशा प्रकारे पैसे खर्च करण्यात येणार आहे.
एकदा मुदतवाढनूतनीकरणाच्या कामाची वर्कऑर्डर १७ जुलै २०२३ रोजी देण्यात आली होती. काम सहा महिन्यात पूर्ण करण्याची मुदत होती. मात्र या कालावधीत काम पूर्ण झाले नाही. ठेकेदारास मुदतवाढ देण्यात आली. ऐन आचारसंहितेत जुने साहित्य काढणे व इतर पहिल्या टप्यात काम केले.
घर मोडून मांडव..जिल्हा परिषदेला ग्रामीण भागात अनेक कामे करण्याची संधी असताना घर मोडून मांडव घालण्याचा प्रकार सुरू आहे. अर्धा कोटीच्या आत नूतनीकरण करणे शक्य असतानाही दीड कोटी कशासाठी, कोणाचा खिसा भरण्यासाठी असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
जिल्हा परिषदेने उत्पन्न वाढीसाठी आपल्या जागा विकसित करण्याऐवजी चांगल्या सुसज्ज सभागृहाच्या नूतनीकरणावर कोट्यवधी रूपये खर्च केले जात आहे हे थांबले पाहिजे. कोणाच्या तरी भल्यासाठी, खिसा भरण्यासाठी निधी खर्च करू नये. -राजवर्धन निंबाळकर, माजी जिल्हा परिषद सदस्य
सभागृहाच्या नूतनीकरणाच्या कामास एकदा मुदतवाढ दिली आहे. पाऊस व इतर कामामुळे वेळेत काम पूर्ण न झाल्याने मुदतवाढ दिली आहे. -सचिन सांगावकर, कार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग, जिल्हा परिषद कोल्हापूर.