सांगली : घरफोडी करून ऐवज घेऊन पळून जाताना रंगेहात पकडलेल्या राजू तुकाराम सुतार (वय २३, रा. कोल्हापूर, सध्या, चिंतामणीनगर, सांगली) याच्याकडून विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाच घरफोड्या उघडकीस आल्या आहेत. त्याच्याकडून ११ तोळे सोन्याचे दागिने, अठराशे रुपयांची रोकड, एक लॅपटॉप असा एकूण साडेतीन लाखांचा ऐवज जप्त केला आहे. त्याच्या अश्वीन आनंदा घोलप (वय २३, रा. पेठवडगाव, जि. कोल्हापूर) या साथीदारास आज (शनिवार) अटक केली आहे. दरम्यान, सुतारला घर भाड्याने देऊन त्याची माहिती पोलीस ठाण्यात कळविली नाही म्हणून घरमालक विलास शामराव साळुंखे (वय ६५, रा. सार्थक बंगला, चिंतामणीगर) यांच्यावरही गुन्हा दाखल केला आहे.गेल्या आठवड्यात सुतारने शिंदे मळ्यातील विनायक पाटील यांचा ‘स्वप्नपूर्ती’ बंगला फोडला होता. सोन्याचे दागिने, रोकड असा ऐवज पळवून नेताना परिसरातील तरुणांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले होते. तेव्हापासून त्याची कसून चौकशी सुरु आहे. तो घरफोडीच्या गुन्ह्यात पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. दोन महिन्यापूर्वी तो सांगलीत सेंट्रींगचे काम करण्यासाठी वास्तव्यास आला. चिंतामणीनगरमध्ये विलास साळुंखे यांच्याकडे भाड्याने खोली घेऊन रहात होता. मात्र सेंट्रींगचे काम सोडून त्याने घरफोड्या करण्यास सुरुवात केली. आतापर्यंत त्याने जावेद हबीब महात (हडको कॉलनी, अभयनगर), विनायक वसंतराव पाटील, सुनीता संभाजी खाडे (शिंदे मळा), प्रदीप श्रीधर प्रभू (अभयनगर) व हणमंत परशाप्पा कांबळे (रामकृष्णनगर, कुपवाड) यांच्या घरात चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे.गेल्या अनेक महिन्यांपासून सुतार हा साळुंखे यांच्याकडे भाड्याने खोली घेऊन रहात होता. साळुंखे यांनी या भाडेकरुची माहिती पोलिसांना कळविणे गरजेचे होते. मात्र तसे त्यांनी केले नाही. यामुळे त्यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक प्रकाश गायकवाड, निरिक्षक धनंजय भांगे, उपनिरीक्षक एन. आर. एकशिंगे, हवालदार राजू कोळी, गजानन गोसावी, पोलीस नाईक गुंडोपंत दोरकर, अभिजित वाघमारे, अरुण टोणे, विनायक शिंदे, शीतल पाटील, झाकीर काझी, हसन मुलाणी, जावीर मुजावर यांच्या पथकाने केली. (प्रतिनिधी)
आणखी पाच घरफोड्या उघडकीस
By admin | Published: September 14, 2014 12:02 AM