कोल्हापूर : कळंबा मध्यवर्ती कारागृहात सापडलेले दहा मोबाईल, गांजा प्रकरण अद्याप तापलेले असतानाच कारागृहातील बराकनजीकच्या अतिसुरक्षा विभागाच्या बाजूस आणखी एक मोबाईल संच चार बॅटऱ्यांसह सापडला. या प्रकरणामुळे कारागृहातील सुरक्षेला पुन्हा हादरा बसला आहे. सोमवारी सकाळी बराकीची झडती घेताना हा प्रकार उघडकीस आला. कारागृहात अतिदक्षता विभागाच्या बाजूस मुख्य रस्त्याकडेच्या भिंतीलगत कापडी पिशवीत अज्ञातांनी हा मोबाईल लपवून ठेवल्याची शक्यता वर्तविली जात आहे. लागोपाठ घडणाऱ्या घटनांमुळे कारागृहातील सुरक्षा व्यवस्थेचे वाभाडे उडाले असून प्रशासनात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कळंबा कारागृहात मंगळवारी सकाळी कापडात गुंडाळलेल्या तीन गठ्ठ्यात दहा मोबाईल, गांजा आदी साहित्य सापडले. अज्ञातांनी सोमवारी मध्यरात्री हे मोबाईल सुरक्षा भिंतीवरून कारागृहात फेकल्याचे सीसीटीव्ही कॅमेरात आढळले. याप्रकरणी सुरक्षेतील ढिसाळपणाचा ठपका ठेवत कारागृहत अधीक्षक शरद शेळके यांची तातडीने उचलबांगडी केली. दरम्यान, कारागृहाचा पदभार घेतल्यानंतर नूतन अधीक्षक चंद्रमणी इंदुरकर यांनी सर्व बराकींच्या झडतीच्या सूचना दिल्या. शुक्रवारी सकाळी ६.३० ते ८.३० या वेळेत तुरुंगाधिकारी महादेव दशरथ होरे यांनी झडती घेताना सर्कल क्र. १, बराक क्र. २ च्या पाठीमागे अतिसुरक्षा विभागाच्या बाजूस मुख्य रस्त्याकडेच्या भिंतीलगत कापडी पिशवी सापडली. त्यामध्ये एक बॅटरीसह मोबाईल, तीन बॅटऱ्या, यूएसबी वायर, चार्जर असे साहित्य मिळाले. अज्ञाताने ही पिशवी लपवून ठेवण्याचे स्पष्ट झाले. याची कारागृह प्रशासनाच्यावतीने जुना राजवाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली.
कैद्यात हाणामारीचा प्रकार
कळंबा कारागृहातील सुरक्षेचे वाभाडे निघाले असतानाच शुक्रवारी रात्री उशिरा कारागृहातील दोन कैद्यात हाणामारी झाली. हाणामारीत एक कैदी जखमी झाल्याची चर्चा आहे. हाणामारीची गंभीर दखल अप्पर पोलीस महासंचालक (कारागृह) यांनी घेतली. त्यांनी दिलेल्या सूचनेनुसार वादावादी झालेले कैदी स्वतंत्र बराकीमध्ये हालविण्यात आले. पण कैद्यांमध्ये किरकोळ शाब्दिक बाचाबाची झाल्याची माहिती नूतन कारागृह अधीक्षक चंद्रमणी इंदूरकर यांनी दिली.