कोल्हापूर : महानगरपालिका हद्दीतील नाकाळा पार्क राजहंस प्रिंटिंग प्रेसजवळील एका रुग्णाला ओमायक्रॉन झाल्याचे चाचणी अहवालावरून स्पष्ट झाले. ओमायक्रॉनबाधित ५७ वर्षीय पुरुष रुग्णाची तसेच त्यांच्या अन्य नातेवाइकांची तब्येतही उत्तम असल्याचे महापालिका सूत्रांनी सांगितले. शहरातील ओमायक्रॉन रुग्णांची संख्या आता दोन झाली आहे.
सोमवारी आढळून आलेल्या ओमायक्रॉनबाधित रुग्णाची मुलगी गोवा येथे जाऊन आली होती. तिच्या संपर्कात हा रुग्ण आला होता. २४ डिसेंबर रोजी रुग्णास ताप, अंगदुखी सुरू झाली होती. त्यामुळे दोघांचे स्वॅब तपासणीला पाठविले होते. दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. दोघांनी खासगी रुग्णालयात उपचार घेतले. त्यानंतर या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या घरातील दोन बहिणी, आई अशा तिघांचे स्वॅब घेण्यात आले. त्यापैकी आईचा स्वॅब पॉझिटिव्ह आला.
संबंधित रुग्ण व त्यांची मुलगी यांचे सॅम्पल जिनोम सिक्वेन्सिंगसाठी २७ डिसेंबरला एनआयव्ही पुणे येथे पाठविण्यात आले होते. त्यापैकी मुलीचा अहवाल निगेटिव्ह तर तिच्या वडिलांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. या रुग्णाने कोव्हॅक्सिनचे दोन डोस घेतले होते. तसेच परदेश प्रवाससुद्धा केलेला नव्हता किंवा परदेश प्रवास केलेल्यांच्या संपर्कातही आलेले नव्हते.
या रुग्णांच्या निकटच्या संपर्कात आलेल्या १६ तर लो रिस्कमधील १० जणांच्या घरी जाऊन महापालिका आरोग्य विभागाने त्यांची माहिती घेतली तसेच ते परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले.