कोल्हापूर : ‘रेमडेसिविर’ या जीवनरक्षक इंजेक्शन काळ्या बाजारात विकणाऱ्या रॅकेटमधील आणखी एका संशयिताचे नाव पोलीस तपासात निष्पन्न झाले. सागर सुतार (वय २४, रा. उजळाईवाडी, कोल्हापूर), असे त्या संशयिताचे नाव आहे. तो अटकेतील संशयितास रेमडेसिविर इंजेक्शन पुरवीत असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. त्याचा पोलीस शोध घेत असल्याचे स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांनी सांगितले.
मंगळवारी अटक केलेले योगिराज राजकुमार वाघमारे (रा. सासने मैदान, कोल्हापूर, मूळ गाव- मोहळ, जि. सोलापूर) व पराग विजयकुमार पाटील (वय २६, रा. गणेश कॉलनी, कसबा बावडा) यांना बुधवारी न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
कोरोनाचा उद्रेक झाल्याने रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे रुग्णासाठी जीवनदायी ठरलेल्या रेमडेसिविर या इंजेक्शनचा तुटवडा भासत आहे. अशा अवस्थेत लोकांच्या अडचणींचा गैरफायदा घेऊन रेमडेसिविर इंजेक्शन काळ्याबाजारात विक्री करण्याचा प्रयत्न करणारी टोळी स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने मंगळवारी उघडकीस आणली. त्यात योगिराज वाघमारे व पराग पाटील या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून ११ इंजेक्शन असा ७० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. दोघांना न्यायालयाने दोन दिवसांची कोठडी सुनावली. पोलीस चौकशीत उजळाईवाडी येथील सागर सुतार या संशयिताचे नाव पुढे आले. तो संशयित अटकेतील परागला ही इंजेक्शन पुरवीत असल्याची माहिती तपासात पुढे आली; पण त्याच्यावर कारवाई करण्यापूर्वीच सागर हा पसार झाला. त्याचा शोध सुरू आहे. तो सापडल्यानंतर या रॅकेटमधील सूत्रधार पुढे येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली.