नागठाणे : कॅन्सर का होतो, याचे उत्तर शोधण्यासाठी आर्मी मेडिकलच्या जवानाने सहा महिने प्रशिक्षण घेतले. मात्र, कॅन्सरला हरविण्यासाठी सहा महिने व्यूहरचना आखणारा बहादूर जवान अखेर कॅन्सरच्या जाळ्यात सापडला अन् याच आजाराने जवानाला हिरावून नेले. माजगाव, ता. सातारा येथील संदीप प्रकाश जाधव हे १४ वर्षांपूर्वी लखनऊ येथे आर्मी मेडिकल कोअरमध्ये भरती झाले. आपल्या बौद्धिक कौशल्यावर त्यांनी एनएसजी कमांडो, पॅरा स्पेशल फोर्स कमांडोमध्ये काम करून आपली कारकीर्द यशस्वी केली. दीड वर्षांपूर्वी कॅन्सर कशामुळे होतो, याचे सहा महिने प्रशिक्षण घेऊन पुन्हा आपल्या सेवेत हजर झाले; पण नियतीने घात केला. ज्या कॅन्सरविरोधी लढ्याचे सहा महिने प्रशिक्षण घेतले, त्याच कॅन्सरने अखेर संदीप जाधव यांना हरविले. गोवा-पणजी येथे उपचारादरम्यान संदीप जाधव (वय ३५) यांचा मृत्यू झाला. जवान संदीप जाधव यांच्या अंत्यविधीस मिल्ट्री हॉस्पिटलचे संजयकुमार ठाकूर, नायब तहसीलदार गणेश भोसले, मनोज घोरपडे, यशवंतराव साळुंखे, नारायण साळुंखे, राजेंद्र जाधव, सहायक पोलीस निरीक्षक विश्वासराव कदम, सैनिक कल्याण अधिकारी सुभेदार भिवराव घाडगे, सुभेदार चंद्रकांत पवार आदी उपस्थित होते. (वार्ताहर)
कॅन्सरविरोधी लढ्यातील
By admin | Published: June 28, 2015 12:28 AM