कोल्हापूर : प्रत्येक क्षेत्रात समतेची पायमल्ली होईल, अशी घटनाविरोधी धोरणे राज्यकर्त्यांकडून राबवली जात आहेत, असे प्रतिपादन ‘लोकमत’चे संपादक डॉ. वसंत भोसले यांनी रविवारी येथे केले.
येथील बागल विद्यापीठाच्या वतीने देण्यात येणारा भाई माधवराव बागल पुरस्कार ज्येष्ठ विचारवंत डॉ. अशोक चौसाळकर यांच्या हस्ते शानदार सोहळ्यात वसंत भोसले यांना प्रदान करण्यात आला. भोसले यांच्यासह त्यांच्या पत्नी मीना शेषू यांनी तो स्वीकारला. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ॲड. अशोकराव साळोखे होते. शाहू स्मारक भवनात हा समारंभ झाला.
भोसले म्हणाले, सध्याच्या परिस्थितीत सामाजिक द्वंद्व वाढत आहे. शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांचे बोट तर आपण कधीच सोडले आहे. राजर्षी शाहूंनी जो समतेचा, गोरगरिबांच्या कल्याणाचा, सर्वसमावेशक विचार कृतीतून जपला त्याचे प्रतिबिंब आपल्या राज्यघटनेत उमटले; परंतु शिक्षणापासून आरोग्यापर्यंत सर्वच क्षेत्रात या धोरणांना तिलांजली देऊन राज्यकर्त्यांकडून घटनाविरोधी धोरणे राबवली जात आहेत. त्याला कसे तोंड देणार हे आपल्यासमोरील खरे आव्हान आहे. पर्यावरणाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असताना आपण अजूनही त्याकडे फारशा गांभीर्याने पाहत नाही. त्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मोफत करण्यासारखे उपाय आपल्याला योजण्याची गरज आहे.
भोसले म्हणाले, माधवराव बागल यांच्या विचाराचा जागर कोल्हापूरने जोमाने केला पाहिजे. कारण त्याच विचारांची समाजाला आज जास्त गरज आहे. कोल्हापूर अनेक बाबतीत खुमखुमी दाखवते. थोरपुरुषांच्या विचारांचा उत्सव करते; परंतु त्यांच्या विचारांची जपणूक करण्यात मात्र मागे पडत आहे. ते चित्र बदलण्यासाठी बागल यांचे विचार जागरण महत्त्वाचे आहे.
डॉ. अशोकराव चौसाळकर म्हणाले, भाई बागल यांनी मांडलेले धर्मनिरपेक्षतावाद, समाजवाद, विवेकवाद आता धोक्यात आला आहे. धर्मसत्तेचा राज्यसत्तेवरील प्रभाव वाढतो तेव्हा समाजात क्षोभ निर्माण होतो, असे बाळशास्त्री जांभेकर यांनी १८३२ला दर्पणमध्ये म्हटले होते. त्याचाच अनुभव देश सध्या घेत आहे.
प्रारंभी भाई बागल यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्याध्यक्ष प्रा. टी. एस. पाटील यांनी प्रास्ताविकात विद्यापीठातर्फे पुरोगामी विचारांच्या कार्यकर्त्यांना घडवणारी शिबिरे घेण्याचा मनोदय व्यक्त केला. ॲड. साळोखे यांनी अध्यक्षीय समारोप केला. ‘ लोकमत’चे उपवृत्त संपादक विश्वास पाटील यांनी मानपत्र वाचन केले. अनिल घाटगे यांनी सूत्रसंचालन केले. संभाजी जगदाळे यांनी आभार मानले. व्यासपीठावर रवी जाधव, तनुजा शिपूरकर, चंद्रकांत यादव आदी मान्यवर होते.
समारंभास सुरेश शिपुरकर, बाळ पाटणकर, अरुण नरके, व्ही. बी. पाटील, विनोद डिग्रजकर, वसंतराव मुळीक, प्रमिला जरग, लोकमतचे सहायक उपाध्यक्ष मकरंद देशमुख, व्यंकाप्पा भोसले, उदय कुलकर्णी, शाहीर राजू राऊत, प्राचार्य अजेय दळवी, मेघा पानसरे, भारती पोवार, शरद कारखानीस, इंद्रजित सावंत, जीवन बोडके, जयवंत भोसले आदींसह विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उमेदवार शोधताना दमछाक...
कोल्हापूर हा राजकीय व सामाजिकदृष्ट्या प्रगत जिल्हा असतानाही उद्याच्या लोकसभा निवडणुकीसाठी देशाच्या पातळीवर ठसा उमटवू शकेल, असा एक उमेदवार आपल्याला मिळत नाही ही चांगली बाब नसल्याचे संपादक भोसले यांनी सांगितले.