शेतकरी विरोधी शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही : अजित पवार
By विश्वास पाटील | Published: August 11, 2024 07:14 PM2024-08-11T19:14:10+5:302024-08-11T19:14:36+5:30
शक्तीपीठ विरोधी समितीच्या शिष्टमंडळास पवार यांचे आश्वासन
कोल्हापूर: शेतकरी विरोधी शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी येथे दिली. अर्थखाते माझ्याकडे आहे, मी या महामार्गसाठी निधीच देणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर आंदोलन, निदर्शने करण्याचे जाहीर केले होते. यावर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी कृती समितीचे निमंत्रक गिरीश कोंडे यांना फोन करून आंदोलन न करता चर्चेची वेळ देतो, असे आश्वासन दिले. त्यावर आंदोलकांनी आंदोलन स्थगित करत अजित पवार यांच्याशी शासकीय विश्रामगृह येथे चर्चा केली.
समितीचे फोंडे यांनी शक्तीपीठ महामार्ग विरोधात कोल्हापूर सहित 12 जिल्ह्यांचे शेतकरी आंदोलन करत आहेत. शासनाने तात्काळ हा महामार्ग रद्द करावा अशी मागणी केली. मुख्यमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री हे केवळ तोंडी स्थगिती असल्याचे सांगतात पण दुसरीकडे शेतकऱ्यांना नोटीस देत आहेत तसेच पर्यावरण विभागाकडे मंजुरीसाठी प्रस्ताव पाठवत आहेत हे चुकीचे आहे असे निदर्शनास आणून दिले.
त्यावर उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, "शक्तीपीठ महामार्गाला बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विरोध आहे. मी मुश्रीफ यांच्याकडून कोल्हापुरातील आंदोलनाची माहिती घेतली आहे. त्यामुळे माझा देखील या शक्तिपीठ महामार्गाला ठाम विरोध आहे. हा महामार्ग होऊ देणार नाही."
मंत्री प्रकल्पास स्थगिती दिल्याचे सांगतात पण प्रकल्पाची प्रक्रिया पुढे रेटली जात असल्याच्या बातम्या आहेत असे समितीने निदर्शनास आणून दिले..त्यावर पवार म्हणाले, प्रकल्पाचे काम सुरु असल्याचे शासनाने आपल्याला काय कळवले आहे काय..? तसे पत्र असल्यास दाखवा.. पर्यावरण विभागाची मान्यता प्रस्तावासाठी दिलेल्याचा काही पुरावा कोणाकडे नाही. अजित पवार गुलाबी जॅकेट घालून, वैशानंतर करून अमित शहा यांना भेटायला गेले, अशा बातम्या माध्यमानी दिल्या, त्या खोट्या होत्या. शक्तिपीठ महामार्ग मंजुरीचेही तसेच आहे.
शिष्टमंडळाने पुढे विचारले की, "ग्रामस्थांना शेतकऱ्यांना नोटीसा गावांमध्ये येत आहेत. जर स्थगिती असेल तर हे कसे काय?" त्यावर उपमुख्यमंत्री पवार यांनी समोर उभा असलेल्या जिल्हाधिकाऱ्यांना विचारले कोणत्या नोटीस जात आहेत ? त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्याकडील नोटिफिकेशन दाखवले.
फोंडे मुख्यमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री या सर्वांची एक बैठक घ्या अशी विनंती केली. त्यावर उपमुख्यमंत्री पवार म्हणाले," की मी जर तुम्हाला हा महामार्ग मीटिंग न घेता रद्द करून दाखवत असेल तर काय अडचण आहे. यावर शिष्टमंडळाने आमची कोणती अडचण नाही तुम्ही विना मीटिंग हा महामार्ग रद्द करा असे स्पष्ट केले.
पुढे अजितदादा म्हणाले," मला गिरीश फोंडे तुम्ही तुमचा फोन नंबर द्या. मी माझ्या स्तरावर प्रश्न होता तो गरज लागली की तुम्हाला फोन करतो. याचे संबंधित कुणाकडे खाते आहे असे अजित पवार यांनी मुश्रीफ यांना विचारले" , यावर मुश्रीफ यांनी सार्वजनिक मंत्री दादा भुसे यांचे नाव सांगितले.
पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या सांगण्यावरून अधिकारी व पोलीस यांनी शिष्टमंडळासोबत अजित पवार यांची स्वतंत्र बैठक अँटी चेंबर मध्ये आयोजित केली होती. मात्र पवार यांनी अँटी चेंबर जवळ येतात प्रत्यक्ष आंदोलकांना विचारपूस करत तात्काळ चर्चेला सुरुवात केली. त्यांच्या लोकांच्यात अनौपचारिक रित्या मिसळत धडक निर्णय घेण्याचे पद्धतीची प्रत्यय आंदोलकांना व पोलीस तसेच प्रशासनाला आला. यावेळी जिल्हाधिकारी अमोल एडगे, महापालिका आयुक्त के मंजू लक्ष्मी, सी ई ओ कार्तिकेयन उपस्थित होते.
संघर्ष समितीच्या शिष्टमंडळामध्ये
समितीचे समन्वयक गिरीश फोंडे,सम्राट मोरे , कृष्णात पाटील प्रकाश पाटील ,शिवाजी कांबळे, योगेश कूलनमोडे ,नितीन मगदूम,आनंदा पाटील, तानाजी भोसले, नवनाथ पाटील,संभाजी पाटील, हिंदुराव मगदूम , रणजित मोरे , अजित पाटील,आनंदा देसाई ,सुरज शिंदें, दिनकर पाटील, पांडुरंग पाटील, जालिंदर कुडाळकर ,राजेंद्र पाटिल, शिवाजी पाटील यासह हातकणंगले कागल शिरोळ करवीर भुदरगड आजरा येथील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.