कोल्हापूर : भाजपने लोकसभेच्या ४५ तर विधानसभेच्या २००च्या वर जागा जिंकण्याचा निर्धार केला आहे. यामध्ये महिला मोर्चाचे योगदान राहिल असा विश्वास भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी व्यक्त केला. वाघ या आज, बुधवारी कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांना प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
यावेळी बोलताना वाघ म्हणाल्या, भाजपचे महिला संघटन वाढविण्याचा आमचा प्रयत्न असून त्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील दौऱ्याची आजपासून सुरुवात केली आहे. प्रत्येक बुथवर २५ महिला कार्यकर्त्यांचे जाळे दिसेल असेही त्यांनी सांगितले.
लव्ह जिहादची वाढती प्रकरणे लक्षात घेऊन उत्तरप्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रात सुध्दा लव्ह जिहाद विरोधी कायदा व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. यापूर्वीच आम्ही ही मागणी केली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.महाविकास आघाडी सरकारच्या काळात महिलांवर अत्याचार, बलात्कार, विनयभंगाचे प्रकार घडत होते. परंतू ते सरकार सक्षम, संवेदनशील नव्हते. आजही राज्यात अशा घटना घडत आहेत. परंतु शिंदे-फडणवीस सरकार सक्षम आहे. काही महिन्यात डझनभर पोलिसांना निलंबित केले. तर अशा घटनांना जबाबदार असणाऱ्यावर कडक कारवाई करण्यात आल्याचा दावा चित्रा वाघ यांनी केला.शक्ती कायद्याचे आम्ही यापूर्वीही स्वागत केले आहे. त्याची मागणी आम्ही पहिल्यापासून करत होतो. त्यामध्ये काही त्रुटी होत्या, त्या दुरुस्त झाल्या आहेत. त्यामुळे या कायद्याचा महिलांना, मुलींना फायदाच होईल, असे त्यांनी सांगितले.यावेळी महिला मोर्चच्या जिल्हाध्यक्ष शौमिका महाडिक, गायत्री राऊत, महेश जाधव, महानगर जिल्हध्यक्ष राहूल चिकोडे, अजित ठाणेकर उपस्थित होते.