विरोधाला विरोधाचे राजकारण नको : रामाणे
कोल्हापूर : शासनाकडून लोकसंख्येवर आधारित निधी येतो. महापालिकेचा एलबीटी आणि जकात बंद झाल्यामुळे उत्पन्नाचे मार्ग संपले व खर्च वाढला आहे; त्यामुळे हद्दवाढीशिवाय पर्याय नाही. ग्रामीणच्या लोकप्रतिनिधींनी विरोधाला विरोध म्हणून राजकारण बाजूला ठेवून हद्दवाढीच्या आडवे येऊ नये. हद्दवाढ ही नैसर्गिक प्रक्रिया असल्याने ग्रामीण जनतेची होणारी दिशाभूल थांबवून सहकार्य करावे, असे आवाहन महापौर अश्विनी रामाणे व आमदार राजेश क्षीरसागर यांनी केले. कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीसंदर्भात मुंबईत उद्या, सोमवारी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत होणाऱ्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी सायंकाळी महापौर अश्विनी रामाणे, आमदार राजेश क्षीरसागर, उपमहापौर शमा मुल्ला, हद्दवाढ सर्वपक्षीय कृती समितीचे अध्यक्ष आर. के. पोवार, अॅड. पद्माकर कापसे, किशोर घाटगे यांनी विश्रामगृहावर एकत्र बसून चर्चा केली. यावेळी मुंबईतील बैठकीत कोणते मुद्दे ताकदीने मांडायचे या विषयावर सखोलपणे चर्चा केली. त्यांतर महापौर रामाणे आणि आमदार क्षीरसागर यांनी पत्रकारांशी चर्चा केली. बैठकीनंतर महापौर रामाणे व आमदार क्षीरसागर म्हणाले, महानगरपालिकेसाठी लोकसंख्येच्या प्रमाणात निधी येतो; पण एलबीटी आणि जकात हे मूळ उत्पन्नाचे मार्ग शासनानेच बंद केले आहेत; त्यामुळे उत्पन्नाचे मार्ग संपले आहेत; पण खर्च वाढतो आहे, त्यामुळे हद्दवाढीशिवाय पर्याय नाही. शहराचा विकास हा गुणवत्तेनुसार झाला पाहिजे, त्यासाठी हद्दवाढ आवश्यकच आहे. लोकप्रतिनिधींनी मताच्या राजकारणासाठी हद्दवाढीला विरोध करण्यापेक्षा ग्रामीण जनतेची दिशाभूल थांबवावी. हद्दवाढीमध्ये आमचा कोणताही राजकीय दृष्टिकोन नाही, श्रेयवादही नाही. हद्दवाढ ही प्रक्रिया नैसर्गिक आहे, त्याच्या आड येऊ नये, असेही आवाहन केले. (प्रतिनिधी) मंत्रालयात उद्या दोन्ही बाजंूची एकत्र बैठक ४हद्दवाढीबाबत समर्थक आणि विरोधक अशा दोन्हीही बाजूंच्या मोजक्याच प्रतिनिधींची मुंबईत मंत्रालयात दुपारी दोन वाजता एकत्रित बैठक बोलाविण्यात आली आहे. या बैठकीत, दोन्हीही बाजूंना समोर घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे चर्चा करणार आहेत. ४या बैठकीत, दोन्हीही बाजंूकडून होणारे समज-गैरसमज दूर करण्यात येऊन एक नियमावली तयार करण्यात येणार आहे. त्यानंतरच हद्दवाढीमध्ये किती गावे घ्यायची, यावर शिक्कामोर्तब होणार आहे. त्यामुळे हद्दवाढीच्या विषयावरून समर्थक आणि विरोधक प्रथमच एकत्र समोरासमोर चर्चेला येणार आहेत. त्यामुळे या बैठकीकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. चंद्रकांतदादांची भेट, चर्चा ४महापौर रामाणे, आमदार क्षीरसागर यांच्या शिष्टमंडळांनी सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयात महसूलमंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची भेट घेतली. ४मुंबईत उद्या, सोमवारी होणाऱ्या बैठकीबाबत मार्गदर्शन घेऊन चर्चा केली. त्यावेळी हद्दवाढीबाबत प्रखर व तांत्रिक मुद्दे मोजक्या शब्दांत मांडणाऱ्या दहा ते बारा जणांना मुंबईतील बैठकीसाठी घ्यावे, असे सांगितले. वाढीव गावांचा विकास आराखडा प्रस्तावित होणाऱ्या गावांचा विकास आराखडा तयार करून गावात वीज, पाणी, रस्ते, आदी मूलभूत सुविधांसाठी शासनाकडून विशेष पॅकेज घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. याशिवाय अर्थसंकल्पात दोन कोटी रुपयांची तरतूदही केल्याचे ते म्हणाले. श्रेयवाद होणार नाही ४आम्हाला हद्दवाढीचा श्रेयवाद करायचा नाही, हद्दवाढ हा आमचा राजकीय दृष्टिकोनही नाही, हद्दवाढीला विरोध हा अडाणीपणातून होत आहे. ४आरक्षणाची नाहक भीती बाळगली जात आहे; पण आरक्षण हे नगरसेवकांमुळे नव्हे, नगरविकास विभागाच्या नियमावलीप्रमाणे पडणार आहे; त्यामुळे आरक्षणाची भीती बाळगू नये. ४हद्दवाढीत कोणतेही राजकारण नाही. फक्त कोल्हापूरचा विकास व्हावा हाच उद्देश आहे. यामध्ये कोणतीही पक्षीय भूमिका नाही, असेही त्यांनी सांगितले. ंआता आरपारची लढाई करू संपत पवार-पाटील : मनपाचा कारभार मुख्यमंत्र्यांसमोर मांडू : मिणचेकर शिरोली : ग्रामीण भागातील जनतेचा रोष पाहून हद्दवाढीची अधिसूचना शासनाने रोखली. आता ती थांबविल्याशिवाय मागे फिरायचे नाही, असा निर्धार हद्दवाढ विरोधी कृती समितीचे अध्यक्ष माजी आमदार संपतबापू पवार-पाटील यांनी व्यक्त केला. मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत होणाऱ्या बैठकीच्या अनुषंगाने कृती समितीने शासकीय विश्रामगृह येथे आयोजित केलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी पाटील म्हणाले, हद्दवाढीविरोधात शेवटपर्यंत आरपारची लढाई करायला लागली तरी चालेल, पण कदापि हद्दवाढ होऊ द्यायची नाही. अधिसूचना निघणार हे समजताच ग्रामीण जनता पेटून उठली. हद्दवाढ थांबविल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा इशारा पाटील यांनी दिला. महापालिकेचा कारभार व ढपला संस्कृती याची माहिती मुख्यमंत्र्यांना पटवून दिल्याचे आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांनी यावेळी सांगितले . आम्हाला मुलगाच पसंत नाही तर तुमच्याबरोबर सोयरीक का करू? जबरदस्तीने सोयरीक केलीच तर मुलगी आत्महत्या करेल, अशा ग्रामीण ढंगात हद्दवाढीला असलेला विरोध मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मांडल्याचे आमदार चंद्रदीप नरके यांनी सांगितले. आपण नुसत्या शहराचे नसून जिल्ह्याचे पालकमंत्री आहात. ते हद्दवाढबाबतीत दोन्ही बाजूला योग्य भूमिका घेतील, असे सांगत पालकमंत्र्यांच्यावर टीका न करण्याचे आवाहन केले. खासदार राजू शेट्टी, तीन आमदार अशी मोठी ताकद आपल्या पाठीशी आहे. त्यामुळे हद्दवाढ होऊ शकत नाही, असा विश्वास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष भगवान काटे यांनी व्यक्त केला. उद्या मुंबईत मुख्यमंत्र्यां- बरोबर होणाऱ्या बैठकीला अठरा गावांतील पाचजण, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, करवीर, हातकणंगले पंचायत समितीचे सभापती, असे शिष्टमंडळ जाईल, असे संपतबापू पाटील यांनी सांगितले.यावेळी नाथाजी पोवार, जिल्हा परिषद सदस्य बाजीराव पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य महेश चव्हाण, राजू माने, शिरोलीचे उपसरपंच राजू चौगुले, गोविंद घाटगे, एस. आर. पाटील, आदी उपस्थित होते. (वार्ताहर) ..तर ग्रामीण जनता स्वत:हून येईल : महाडिक चाळीस वर्षांत हद्दवाढीचा इतका अट्टाहास केला नाही, मग आताच महापालिका का जोर लावते, असा प्रश्न आमदार अमल महाडिक यांनी उपस्थित केला. आधी शहर सुधारूया, शहराचा विकास झाल्यास ग्रामीण भागातील जनता स्वत:हून समावेश करण्यास तयार होईल. हद्दवाढ झाल्यास आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचे महाडिक यांनी पुन्हा सभागृहात सांगितले.