मलकापूर : जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या आदेशनुसार कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मलकापूर नगर परिषदेच्यावतीने मलकापूर शहरात सोमवारी ३११ नागरिकांची अन्टिजन चाचणीद्वारे तपासणी करण्यात आली. नागरिकांनी उत्स्फूर्तपणे यात सहभागी होऊन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी स्वरूप खारगे यांनी केले आहे.
कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाने कडक भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे. सोशल डिस्टन्स, मास्कचा वापर यावर अधिक भर दिला आहे. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या आदेशानुसार मलकापूर शहरात नगर परिषदेच्यावतीने स्वॅब तपासणीसाठी विशेष मोहीम सुरू केली असून, नागरिकांच्या सोयीसाठी ठिकठिकाणी तपासणी मोहीम सुरू आहे. दरम्यान, नगरसेवकांनीही पुढाकार घेऊन स्वतः तपासणी केल्याने नागरिकांचाही आत्मविश्वास वाढला आहे. नागरिकांनी मनामध्ये कोणतीही भीती न बाळगता आपली स्वॅब तपासणी करून घ्यावी व प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.
यावेळी उपनगराध्यक्ष प्रवीण प्रभावळकर, आरोग्य समिती सभापती सोनिया शेंडे, विरोधी पक्षनेते बाबासाहेब पाटील, नगरसेवक सुहास पाटील, मानसिंग कांबळे यांच्यासह पालिकेचे अधिकारी ए. के. पाटील, महेश गावखडकर, अक्षय माने आदींसह पालिकेचे कर्मचारी उपस्थित होते.